

सांगली : शिवसेनेत पडलेली फूट आणि ठाकरे गटाच्या पडझडीला सर्वाधिक कारणीभूत असलेल्या खासदार संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आपल्या राजकीय कार्यशैलीतून आणि ग्रामविकासाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करणाऱ्या ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर बेताल टीका करणाऱ्या राऊतांना मानसिक उपचाराची गरज आहे. त्यांची मोफत सोय आम्ही मिरजेतील प्रसिद्ध मानसोपचार रुग्णालयात करू, असा जोरदार प्रतिहल्ला भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी केला आहे.
गेल्या पंधरा दिवसांत संजय राऊत यांनी दोन वेळा जयकुमार गोरे यांच्यावर पातळी सोडून टीका केली. त्यावर गोरे यांनी अत्यंत संयमाने 'मी राऊत यांना ओळखत नाही, कोण संजय राऊत', अशा शब्दांत त्यांना दुर्लक्षित केले. तरीही राऊतांकडून अर्वाच्च भाषेचा वापर सुरूच असल्याने पृथ्वीराज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे तीव्र संताप व्यक्त केला आहे.
त्यातच २०१९ च्या महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या काळातील त्यांच्या कर्तबगारीचे काही किस्से आता उघड होत असल्याने काय करावे, हे त्यांना कळेनासे झाले आहे. ही बिकट मानसिक अवस्था असून अशा वेळी उपचारांचीच आवश्यकता असते, अन्यथा हा आजार बळावण्याची भीती असते.
जयकुमार गोरे यांनी संघर्षातून राजकारणात स्वतःला सिद्ध केले आहे. ग्रामविकास मंत्रालय प्रभावीपणे सांभाळले आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा कणा मजबूत करण्याचे काम ते करत आहेत. सामान्य माणसाला बळ देणाऱ्या योजना राबवत आहेत.