

सांगली : शुक्रवार... वेळ सायंकाळी 6 वाजून 5 मिनिटांची... इस्लामपूर पोलिसांची गाडी सांगली कारागृहाजवळ पोहोचलेली... तोवर संशयित वैद्यकीय कारणे देऊ लागला... त्याला औषध घेण्यासाठी पोलिस गाडीतून उतरले... अन् याचाच फायदा घेत हातातील बेड्यातून हात काढून घेऊन त्याने धूम ठोकली... पोलिसांनी पाठलाग केला... परंतु संशयित पसार झालेला... अखेर तो कोयना एक्स्प्रेसमध्ये असल्याचा सुगावा लागला... अवघ्या तासाभराच्या आतच त्याला मिरज जंक्शन गाठून, कोयना एक्स्प्रेसमधून ताब्यात घेत पुन्हा बेड्या ठोकल्या.
इस्लामपूरमध्ये तीन दिवसांपूर्वी हानिफाबी मदनसाब मुल्ला या 65 वर्षांच्या वृद्धेचा एकाने खून केला होता. खुनानंतर त्यांचे सोने चोरून नेले होते. याद़ृष्टीने इस्लामपूर पोलिस तपास करीत असताना, हा खून मुवाज इलाही मुलाणी (वय 21, रा. ईदगाह मैदान, इस्लामपूर) याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्याने हानिफाबी यांना शेतात काम असल्याचे सांगून नेऊन, खून करून सोने चोरी केल्याची कबुली दिली होती. त्यामुळे त्याला सुरुवातीला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याला शुक्रवारी पुन्हा इस्लामपूर न्यायालयात हजर केले, त्यावेळी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यामुळे जिल्हा कारागृहाच्या ताब्यात देण्यासाठी इस्लामपूर पोलिस मुवाज याला घेऊन सांगलीत आले होते. ते कारागृहाजवळ येताच त्याने वैद्यकीय कारणे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याच्यासाठी औषध घेण्यास इस्लामपूर पोलिस थांबले. याचाच फायदा घेत त्याने हातातील बेड्या काढून पलायन केले. पोलिसांनी पाठलाग केला, परंतु त्याने पळ काढला.
स्थानिक गुन्हे शाखा आणि इस्लामपूर पोलिस त्याचा शोध घेत होते. त्यावेळी तो मिरज रेल्वे जंक्शनवर कोयना एक्स्प्रेसमध्ये असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. पोलिसांनी मिरज जंक्शन गाठून, कोयना एक्स्प्रेसमधून त्याला तातडीने ताब्यात घेत पुन्हा बेड्या ठोकल्या. परंतु या घटनेमुळे मात्र पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती.