सांगली : जरांगेंच्या आंदोलनाचे शरद पवार पहिले राजकीय बळी
सांगली : खा. शरद पवार यांनी मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेला पाठिंबा दिला. आता पवार हे मराठा समाजापुरते नेते राहिले आहेत. जरांगेंच्या आंदोलनातील शरद पवार हे पहिले राजकीय बळी ठरल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक, अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
जरांगे यांनी विधानसभेला उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले होते. त्यांनी जर उमेदवार उभे केले नाहीत, तर ते खा. शरद पवार यांच्या इशार्यावर आंदोलन करीत होते हे स्पष्ट होईल, असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले. आरक्षण संवाद सभेसाठी ते सांगलीत आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन सुरू केले. या मागणीला आतापर्यंत शरद पवार यांनी शिताफीने टाळले होते. पण रत्नागिरीतील सभेत त्यांनी मागणी योग्य असल्याचे जाहीर केले. जरांगे यांच्या आंदोलनातील पहिला राजकीय बळी ते ठरले आहेत. सामान्य मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाचा फायदा होणार नाही. जरांगे यांची मागणी संविधानिक नाही. 55 लाख कुणबी प्रमाणपत्रे बेकायदा आहेत, ती रद्द करावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीसारखी परिस्थिती आता राहिलेली नाही. विधानसभेच्या निवडणुकीत मराठवाड्यात मराठा व ओबीसी यांच्यात लढत होईल, तर इतर जिल्ह्यांत शाब्दिक नव्हे, तर मानसिक लढाई होणार आहे. विधानसभेनंतर आरक्षण कसे वाचविता येईल, यासाठी ओबीसी प्रयत्न करणार आहेत. ओबीसींबरोबर आता अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणासाठी क्रिमिलेअरची अट घालण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात समिती नेमली जाणार आहे. त्यामुळे हा वर्ग आता महाविकास आघाडीच्या पाठीशी राहील असे वाटत नाही. मुस्लिम समाजाने लोकसभेच्या निवडणुकीत संविधान वाचविण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता, पण आता मुस्लिम संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांनी राज्यातील 44 मतदारसंघ काँग्रेसकडे मागितले आहेत. त्याची पूर्तता झाली, तर मुस्लिम मतदार महाविकास आघाडीबरोबर असतील.
हिंदुत्ववादी संघटनांचा राज्यात दंगली घडविण्याचा प्रयत्न होता. 22 ठिकाणी तशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण सामान्य जनतेने दंगल होऊ दिली नाही. धर्मावर आधारित राजकारणाला लोकांनी पूर्णविराम दिला आहे. बेरोजगारी, महागाई, शेती, विकास यांसारखे प्रश्न जनता विचारत आहे. दरम्यान, सभेत ते म्हणाले, न्यायालयाने आरक्षण वर्गीकरणाबाबत दिलेल्या निर्णयाबाबत उदासीनता दिसत आहे. चळवळ आणि समाजाशी बांधिलकी संपत चाललेली आहे. ओबीसी, आदिवासी आरक्षणाबाबत जागृत होऊन संघटित होत आहेत. मात्र अनुसूचित जाती, जमातीबाबत ते होताना दिसत नाही. विचारांचा बधीरपणा आला आहे. अधिकारावर हल्ला झाल्यानंतरही समाजात शांतता दिसत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे समाजाला मिळवून दिले, ते आता तुमच्या भूमिकेमुळे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. महायुतीबरोबर महाविकास आघाडीमधील पक्षांचा आरक्षण संपविण्याचा डाव आहे. आरक्षण कायम ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रत्येक जिल्ह्यातून दोन उमेदवार निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रा. सोमनाथ साळुंखे, इंद्रजित घाटे, महावीर कांबळे, नितीन सोनवणे, विज्ञान माने आदी उपस्थित होते.
बच्चू कडू यांच्याबरोबर जाणार नाही
अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’चा वापर झाला. पण आता महाविकास आघाडी असो किंवा महायुती, त्यांना आघाडी करायची असेल तर त्यांनी आमच्याबरोबर चर्चा करावी. माजी खा. राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती, आ. बच्चू कडू यांनी तिसर्या आघाडीचा पर्याय निर्माण केला आहे. पण आम्ही बच्चू कडू यांच्याबरोबर जाणार नाही. त्यांनी जर पश्चिम महाराष्ट्रापुरती आघाडी करण्याचा निर्णय घेतला, तर आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करू.