

सांगली : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केट पूर्णपणे कोसळला आहे. तर दुसरीकडे अमेरिकन डॉलर महाग होत चालला आहे. शासनाकडे येणाऱ्या जीएसटी चा ओघ कमी होत चालला आहे. अर्थव्यवस्थेवरचे हे मोठं संकट आहे. विरोधी पक्षांनी दुर्दैवाने या घसरत चाललेल्या आर्थिक परिस्थितीवर मौन पाळले आहे. अमेरिका आणि अदानीचे काय होईल ते होईल, पण याचा बागलबुवा म्हणून वापर केला जात आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केंद्र सरकार सह विरोधी पक्षांवर केली आहे. ते सांगलीत आज (दि.२०) पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कुंभमेळा हा लोकांचा भावनिक, वैयक्तिक प्रश्न आहे. या कुंभ मेळ्याची उत्तर प्रदेश सरकारने सोय केली. पण ज्या पद्धतीने कुंभमेळ्याचे मार्केटिंग चाललेले आहे, त्याचा निषेध आहे. कुंभमेळ्यात १ हजाराहून लोकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला, हे दुर्दैवी आहे. शासनाने फक्त ३८ लोक मृत झाल्याचे जाहीर केले आहे. हिंदू संघटनांना आवाहन आहे, या लोकांचे अंत्यविधी कसे केले हे जाहीर करावे. या सगळ्या घटना पाहता धर्माचे राजकारण देशाला आता धोक्याच्या घटकेपर्यत पोचवलेय. ज्याची विरोधी पक्षाने चर्चा केली पाहिजे. आज विरोधी पक्ष लकवा मारलेल्या परिस्थितीत गेला आहे. त्यातून त्यांनी स्वतःला सावरत दुरुस्त करावे आणि हिटलरशाही सरकारचा विरोध करावा, असेही आंबेडकर म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोन्ही राजाने इतिहास निर्माण केला. तो प्रेरणादायी आहे. पण त्यात अडकून राहण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घेत आपण नवा इतिहास निर्माण केला पाहिजे, ही मानसिकता मराठा समाजाने ठेवली पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले.