

सांगली : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक नीट पीजी 2025 चा निकाल 19 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर झाला. निकाल लागून दोन महिने उलटूनही अद्याप प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांकडून संताप व्यक्त होत आहे.
नीट पीजी 2025 ची परीक्षा 3 ऑगस्टरोजी मध्ये घेण्यात आली. या परीक्षेच्या निकालाआधारे वैद्यकीय पदवीधारकांना एम.डी. एम.एस., डी.एन.बी. (6 वर्षांचा अभ्यासक्रम) आणि पीजी डिप्लोमा यासारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. यावर्षी 2,42,678 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यापैकी 2,30,114 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. निकाल जाहीर होऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी मेडिकल कौन्सलिंग कमिटीने (एमसीसी) पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्याची प्रवेश प्रक्रियादेखील सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याची मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.
गतवर्षीसारखा नीट पीजी परीक्षेत यंदा कोणताही गोंधळ न झाल्याने प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु निकाल लागून दोन महिने झाले तरी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन ती पुढे किती महिने चालेल याबाबत अनिश्चितता आहे. त्यातच अनेक महाविद्यालयांनी अद्याप प्रवेश शुल्क जाहीर केलेले नाही. पारदर्शक प्रवेश प्रक्रिया पार पडण्याच्या दृष्टीने अनेक बदल होणे आवश्यक आहे, असे मत वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक डॉ. परवेज नाईकवाडे यांनी व्यक्त केले.