

सांगली : दिवाळीनंतर नव्या इंद्रायणीचा येणारा गंध यंदा अजूनही दरवळलेला नाही. निसर्गचक्राच्या गर्तेत यंदा इंद्रायणीबरोबरच इतर सगळ्याच तांदळाच्या जाती भरडल्या गेल्या आहेत. त्याचाच परिपाक म्हणून यंदा दिवाळीनंतरचा नव्या तांदळाचा हंगाम किमान 20 दिवसांनी लांबला आहे. जुना तांदूळ बाजारपेठेतून संपत आला आहे, तरीही नव्या तांदळाची आवक झालेली नाही. दरवेळी तांदूळ विकला जावा म्हणून शेतकरी चिंताग्रस्त असतो. पण यंदा नवा तांदूळ आला नाही, म्हणून व्यापारी आणि ग्राहक चिंतातूर आहेत.
जिल्ह्यात 13 हजार 441 हेक्टर क्षेत्रात तांदूळ लागवड होते. चवीला गोड, मऊ गुरगुट्या आणि लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरलेला ‘इंद्रायणी’ तांदूळ जिल्ह्यात रुजतोय. शिराळा तालुक्यातला इंद्रायणी महाराष्ट्रात तर प्रसिध्द आहेच, मात्र वाळवा आणि पलूस तालुक्याच्या काही भागातही इंद्रायणीचे उत्पादन घेतले जाते. नाशिक, बेळगाव, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, शिराळा आणि वाळवा अशा सात ठिकाणांहून सांगली मार्केटमध्ये इंद्रायणी तांदूळ येतो. प्रत्येक गावाची माती, हवामान, वातावरणातील आर्द्रता यामुळे इंद्रायणीचा वास आणि गोडवा बदलतो. तरीही नाशिक आणि बेळगाव, आजऱ्याच्या इंद्रायणीला सांगलीकरांची पसंती अधिक आहे. परंतु दर वाढत आहे. सध्या इंद्रायणीचा दर 70 ते 75 रुपये किलो आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये इंद्रायणीच्या कापणीला सुरुवात होते. पण यावेळी पावसाने हंगाम बिघडला.
ग्राहकांकडून इंद्रायणीचाच आग्रह
इंद्रायणीचा भात मऊ आणि पचायला हलका असल्याने आता तो कुटुंबवत्सल आहे. त्याच्या प्रेमात असणाऱ्या खवय्यांची संख्या वाढतच आहे. हॉटेलचालकही इंद्रायणीचा भात स्पेशल डिश म्हणून देण्याची तयारी दर्शवत आहेत. मोकळा, पांढरा शुभ्र बासमतीचा तोरा कमी करत इंद्रायणीने आघाडी घेतल्याने जिथं तिथं इंद्रायणीचा डंका आहे. इंद्रायणी तांदळात व्हिटॅमिन बी किंवा थायमिन मुबलक प्रमाणात असते. हे जीवनसत्त्व ऊर्जा वाढवण्यास आणि मूड स्थिर करण्यास मदत करते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करते. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तीला देखील त्याचा आनंद घेता येतो. एका एकरामागे इंद्रायणीचे 40 पोती उत्पादन होते. एका पोत्यात 70 किलो तांदूळ असतो. या अंदाजाने एका एकरामागे 2800 किलो इंद्रायणी तांदळाचे उत्पादन घेतले जाते.