

विटा : अडीच वर्षांपूर्वी राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत खानापूर मतदार संघातील पारे, ढवळेश्वर आणि आटपाडी तलावांना मंजूर झालेल्या साडे नऊ कोटी रुपये निधीचे काय झाले ? असा असा प्रश्न आता लोक विचारत आहेत.
अनेक वेळा मंत्री, आमदार मंडळी मोठमोठ्या घोषणा करतात. मात्र या घोषणांचे पुढे काय ? याबाबत लोकांना जाणून घ्यायची उत्सुकता नेहमीच असते. अडीच वर्षांपूर्वी म्हणजे अगदी नेमकेपणाने सांगायचं झालं तर, २८ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हा परिषदेचे तत्कालीन माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान आमदार सुहास बाबर यांनी महाराष्ट्र सरकारने राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत खानापूर मतदारसंघातील दरगोबा (पारे), ढवळेश्वर आणि आटपाडी या तीन तलावांची निवड केली आहे.
यासाठी एकूण ९ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले होते. तसेच या मतदारसंघातील तलावांचे सुशोभिकरण होईल, त्यामुळे जिल्ह्याच्या एकूणच सौंदर्यात भर पडेल. शिवाय ते पर्यटन स्थळ म्हणून विकसित होतील असे सुहास बाबर यांनी सांगितले होते. विशेष म्हणजे आमदार अनिल बाबर यांनी शासन दरबारी यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. याचाच परिणाम म्हणून राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत खानापूर मतदारसंघातील दरगोबा (पारे), ढवळेश्वर आणि आटपाडी या तीन तलावांना हा निधी मंजूर झाला होता. या निधी तून तलावांचे किनारा सौंदर्यीकरण, हरित पट्टा, संरक्षक भिंत, हायमास्ट पोल, मनोरंजनासाठी बालोद्यान, नौकाविहार व स्वच्छतागृहे अशा पध्दतीने कामे करण्यात येणार होती.
राज्य शासनाने राज्यातील तलाव सरोवरे व मोठे जलाशय पर्यावरणीय दृष्ट्या संवर्धन करण्यासाठी सन २००६-०७ वर्षापासून ही योजना सुरू केली. दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निधी मिळावा म्हणून याबाबत प्रयत्न केले होते. त्यानुसार ढवळेश्वर तलावासाठी सुमारे २ कोटी ८८ लाख, तर पारे येथील दरगोबा तलावासाठी ३ कोटी ७१ लाख आणि आटपाडी तलावा साठी सुमारे २ कोटी ८५ लाख रुपये निधी मंजूर झाला होता. मात्र प्रत्यक्षात यातील काही एक काम झालेले नाही, असे असताना मग मंजूर झालेल्या साडेनऊ कोटी रुपयांच्या निधीचे नेमके काय झाले असे आता लोक विचारीत आहेत.