

सांगली : सांगली जिल्ह्यात घडलेली १४ वर्षीय निष्पाप वेदांत बंडगर याची हत्या ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाही, तर ती महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारी आणि संपूर्ण समाजव्यवस्थेला काळिमा फासणारी धक्कादायक शोकांतिका आहे.
एका हद्दपार असलेल्या सराईत गुंडाने घरात घुसून महिलेला पिस्तूलचा धाक दाखवणे, खंडणी मागणे, भर चौकात गोळीबार करणे आणि थेट पोलिस ठाण्यासमोर ''तुझ्या मुलांना संपवतो'' असे आव्हान देऊन एका निष्पाप बालकाचा डोळ्यात गोळी घालून हत्या करणे, हा प्रकार कोणत्याही चित्रपट कथेलाही लाजवणारा आहे. २४ तासाच्या या थरारनाट्यात ज्या पद्धतीने पोलिस यंत्रणेने केवळ बघ्याची भूमिका घेतली, ते पाहता, आता ''सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'' या ब्रीदवाक्यावर जनतेने विश्वास कसा ठेवायचा, असा संतप्त सवाल निर्माण झाला आहे.
काबाडकष्ट करणाऱ्या हमाल कामगारांच्या हक्कासाठी लढणारे नेते बाळासाहेब बंडगर आणि मारुती बंडगर यांच्या कुटुंबावर झालेला हा आघात पोलिस आणि गुन्हेगार-राजकारणी यांच्यातील अभद्र युतीचे जिवंत उदाहरण आहे. हमाल संघटनेच्या कार्यकर्त्याला धमकी मिळाल्यानंतर, शेकडो कामगार न्यायासाठी जत पोलिस ठाण्यासमोर ठाण मांडून बसले होते. नीलेश गडदे नावाच्या या गुंडावर गुन्हा दाखल व्हावा, एवढीच त्यांची साधी मागणी होती. परंतु, कायद्याचे रक्षण करण्याऐवजी पोलिस यंत्रणा राजकीय नेत्यांच्या फोनचे वजन तोलण्यात व्यस्त होती, ही अत्यंत शरमेची बाब आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हेगारावर कारवाई होऊ नये म्हणून अनेक राजकीय नेत्यांनी पोलिसांवर दबाव आणला, तर काहींनी थेट पोलिस ठाण्यातच ठाण मांडले. जेव्हा एखादा गुंड थेट पोलिस ठाण्याच्या आवारात येऊन पुन्हा पिस्तूल काढण्याची हिंमत करतो आणि पोलिसांसमोरच बंडगर यांना ''मुलांना संपवण्याची'' उघड धमकी देऊन निघून जातो, तेव्हा पोलिसांचा धाक संपला आहे, की त्यांनी गुन्हेगारांसमोर गुडघे टेकले आहेत, असा प्रश्न पडतो. जर पोलिसांनी त्याचवेळी जतमध्येच गडदेला बेड्या ठोकल्या असत्या, तर आज लहानगा वेदांत आपल्या कुटुंबात सुरक्षित असता.
''मसल पाॅवर'' अन् निवडणुकीचे राजकारण
गेल्या काही वर्षांत पोलिस दलात राजकीय हस्तक्षेप पराकोटीला पोहोचला आहे. लोकप्रतिनिधी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी अशा सराईत गुन्हेगारांचा, त्यांच्या ''मसल पाॅवर''चा वापर करून घेत आहेत. नीलेश गडदे हा जेलमधून सुटल्यापासून खंडणी गोळा करणे आणि तरुणांची गँग बनवून दहशत निर्माण करण्याचे काम करत होता. निवडणुकीत विरोधी उमेदवारांना धमकावणे, जयंती-पुण्यतिथीच्या रॅलींमध्ये गर्दी जमवून नेत्यांना ताकद दाखवणे, अशा कामांसाठी या गुंडांना राजाश्रय दिला जातो. नेत्यांच्या याच वरदहस्तामुळे अशा गुन्हेगारांची मजल निष्पाप मुलांची हत्या करण्यापर्यंत जाते. स्वतःला जनतेचे सेवक म्हणवून घेणारे लोकप्रतिनिधी जेव्हा अशा नराधमांच्या पाठीशी उभे राहतात,तेव्हा ते केवळ एका गुन्ह्यात भागीदार होत नाहीत, तर संपूर्ण समाजव्यवस्था उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरतात.
अजूनही वेळ गेलेली नाही!
वेदांत बंडगरचा बळी हा राजकीय नेत्यांचा दबाव आणि पोलिसांच्या अक्षम्य निष्क्रियतेचा एकत्रित परिणाम आहे. या घटनेने सांगलीकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर गुन्हेगार जर असे उजळ माथ्याने फिरणार असतील, तर सामान्य जनतेने दाद कोणाकडे मागायची?
वेळ अजूनही गेलेली नाही. गृहखात्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, केवळ मुख्य आरोपीवरच नाही, तर त्याला पाठीशी घालणाऱ्या त्या ''अदृश्य'' राजकीय नेत्यांवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली पाहिजे. एका नीलेश गडदेला वेळीच ठेचले नाही, तर या मातीत असे अनेक गुंड तयार व्हायला वेळ लागणार नाही. लोकप्रतिनिधींनी आपला राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून आणि पोलिसांनी आपल्या खाकीची शान राखून या गुन्हेगारी प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन करणे, हीच वेदांतला खरी श्रद्धांजली ठरेल!