

सांगली/मिरज : शिवराज्याभिषेक व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि मिरज शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी दोन्ही शहरांतून संचलन केले. संचलनात पोलिस अधिकारी, कर्मचारी, दंगल नियंत्रण पथक सहभागी झाले होते.
सांगली उपविभागातील सांगली शहर, सांगली ग्रामीण, विश्रामबाग, संजयनगर आणि विश्रामबाग पोलिस संचलनालयात सहभागी झाले होते. स्टेशन चौक, बदाम चौक, नळभाग, विक्रांत चौक, पंचमुखी मारुती रस्तामार्गे हिराबाग कॉर्नर असे संचलन करण्यात आले. यामध्ये सांगली शहरचे निरीक्षक संजय मोरे, वाहतूक निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव, सांगली ग्रामीणचे किरण चौगुले यांच्यासह 13 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, दंगल नियंत्रण पथक, 78 पोलिस, 58 होमगार्ड उपस्थित होते.
मिरजेत महात्मा गांधी चौक, हिरा हॉटेल चौक, पार कट्टा, गवळी गल्ली, बोकड चौक, फुलारी चौक, महाराणा प्रताप चौक, किसान चौकमार्गे संचलन करण्यात आले. यामध्ये मिरज विभागातील मिरज शहर, मिरज ग्रामीण, महात्मा गांधी चौक, मिरज वाहतूककडील पोलिस सहभागी झाले होते. यावेळी मिरज शहरचे निरीक्षक किरण रासकर, महात्मा गांधी चौकचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह 2 सहायक पोलिस निरीक्षक, 4 पोलिस उपनिरीक्षक, जलद कृती दलाचे एक पथक, दंगल नियंत्रणचे एक पथक, 77 पोलिस अंमलदार, 50 होमगार्ड आणि 5 वाहने सहभागी होते.