

मिरज : मिरजेतील यंदाचा गणेशोत्सव नशामुक्त आणि डीजेमुक्त करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यासाठी बैठकांवर बैठका घेण्यात येत आहेत. गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांच्या बैठकीनंतर आता डीजे चालक-मालकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करून डीजे लावल्यास कडक करवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा व मिरज शहर पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी सांगितले.
मिरजेतील गणेशोत्सव सुमारे 30 तास चालतो. गणेश आगमन, विसर्जनाचा पाचवा, सातवा, नववा दिवस आणि अनंतचतुर्दशीदिवशी काही मंडळांकडून डीजेचा दणदणाट केला जातो. काही मंडळांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करून आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढली जाते, परंतु काही मंडळांकडून राजकीय वरदहस्त वापरून डीजेचा नियमबाह्य दणदणाट करण्यात येतो. प्रसंगी पोलिस आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रकारही घडत असतात. परंतु हे सर्व प्रकार टाळण्यासाठी मिरज पोलिसांनी आतापासून तयारीला सुरुवात केली आहे. नशामुक्त आणि डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी काही मंडळांच्या अध्यक्षांची बैठक पार पडली होती. आता 40 ते 50 डीजे चालक आणि मालकांची बैठक पार पडली.
या बैठकीत पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा आणि मिरज शहर पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी मार्गदर्शन केले. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सव काळात डीजे लावूच नये, पण ज्या ध्वनियंत्रणेला परवानगी देण्यात येईल, त्या यंत्रणेच्या आवाजाची मर्यादाही नियमानुसार असणे गरजेचे आहे. कोणाच्याही सांगण्यावरून आवाजाची मर्यादा ओलांडल्यास डीजे आणि ध्वनियंत्रणा जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मिरवणुकीत काही राजकीय पक्षांच्या नेत्यांशी निगडित गणेशोत्सव मंडळे असतात. त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे काही मंडळांवर कारवाई होते, काही मंडळांवर कारवाई होत नाही, असा आरोप होतो. परंतु हे टाळण्यासाठी लवकरच राजकीय पदाधिकार्यांची आणि पोलिसांची बैठक पार पडणार आहे. सर्वांच्या सहकार्यानेच डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
गणेश विसर्जन मिरवणुकीत घालून दिलेल्या नियमांनुसारच मिरवणूक पार पडणे गरजेचे आहे. काही ठिकाणी आवाज कमी करून, काही ठिकाणी आवाजाचा दणदणाट केला, तर डीजे सिस्टिमसाठी वापरण्यात येणारा मिक्सर जागेवर जप्त करण्यात येणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणार्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.