

दिलीप जाधव
मळणगाव : सांगली पोलिस दलाच्या संस्कृती पोलिस सबसीडी कॅन्टीनमधील लाखो रुपयांचा अपहार समोर येऊनही दोषींवर ठोस कारवाई झालेली नाही. उलट, प्रकरणाची नव्याने चौकशी सुरू करण्याची मागणी वारंवार होऊनही वरिष्ठ अधिकारी हे प्रकरण सतत थंडवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा चर्चा ऐकायला मिळत आहेत.
संपूर्ण खात्यात चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरलेल्या या प्रकरणात संबंधित आरोपींना कोणाचा तरी वरचा वरदहस्त आहे, असा ठाम संशय आता पोलिस दलातूनच दबक्या आवाजात व्यक्त केला जात आहे. इतकेच नव्हे, तर यामागे वरिष्ठ अधिकार्यांच्या थेट सहभागाची चर्चा सुरू आहे. तेच प्रकरण दाबण्यासाठी यंत्रणांचा वापर करत असल्याची कुजबूज पोलिस मुख्यालयाच्या परिसरात सुरू आहे.पोलिस कर्मचारी आणि कुटुंबीयांना सवलतीत जीवनावश्यक वस्तू पुरवणार्या सबसीडी कॅन्टीनमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. लाखो रुपयांचा माल विकूनही पैसे जमा करण्यात आलेले नाहीत. कॅन्टीन चालकाने अपहाराची कबुली देऊनही त्याच्यावर कारवाई झालेली नाही. एकदा नव्हे, तर दोन वेळा चौकशी होऊनही तपास अर्धवट थांबवण्यात आला. हे प्रकरण आता ‘दाबा आणि विसरून जा’ अशा पद्धतीने हाताळले जात आहे, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, कोणी तरी मोठ्या पदावरील व्यक्तीचा हा अपहार करणार्या कर्मचार्याला थेट पाठिंबा आहे, हे उघड झाल्याचे खात्रीलायक सांगितले जात आहे. ही केवळ आर्थिक फसवणूक नाही, तर पोलिस खात्याच्या शिस्तीवर आणि नैतिकतेवर थेट आघात करणारे हे प्रकरण आहे.
जे पोलिस दल कायदा आणि सुव्यवस्थेची राखण करतं, त्याच दलात जर अशा प्रकारचा अपहार होतो आणि तो दडपला जातो, तर मग सामान्य जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा ? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. पोलिस खात्याच्या सबसीडीवर चालणार्या कॅन्टीनचा पैसा म्हणजे कर्मचार्यांच्या हक्काचा पैसा आहे. तोच जर लुबाडला गेला, तर हा केवळ आर्थिक अपहार नसून, त्यांचा अपमान आहे. यामुळे यापुढील काळात पोलिसांवर विश्वास तरी कसा ठेवायचा, हा खरा प्रश्न आहे.
हा अपहार म्हणजे हिमनगाचे एक टोक आहे. खोलात अजून किती गोष्टी लपलेल्या आहेत, याची कल्पनाही करता येणार नाही. अपहार प्रकरणाची सखोल, स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी व्हावी, दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, हीच वेळेची गरज आहे. अशा भावना पोलिस दलातील अनेक पोलिसांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहेत.