

सांगली : महापालिका क्षेत्रातील हॉकर्स, नो-हॉकर्स झोनची अंमलबजावणी एकाचवेळी न करता टप्प्या-टप्प्याने होणार आहे. महापालिका प्रशासन आणि फेरीवाले सदस्यांचे एकमत होणारे झोन प्रथम जाहीर होतील. त्यानुसार अंमलबजावणी होईल. एकमत न होणार्या झोनबाबत बैठक होईल, पर्यायी उपाययोजनांवर चर्चा व निर्णय होतील, यावर महापालिकेतील फेरीवाला समिती बैठकीत एकमत झाले.
महापालिकेत गुरुवारी फेरीवाला समितीची बैठक झाली. आयुक्त सत्यम गांधी अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, बँकांचे प्रतिनिधी तसेच फेरीवाले समिती सदस्य कैस अलगूर, सुरेश टेंगले, मुजीर जांभळीकर, रेखाताई पाटील, बेबीताई मुल्ला, लताताई दुधाळ, निखिल सावंत, अमित मोतुगडे, सादिक बागवान उपस्थित होते.
महापालिका प्रशासनाने हॉकर्स, नो-हॉकर्स झोन प्रस्तावित करताना फेरीवाले प्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही. प्रस्तावित केलेले झोन सर्वसमावेशक नाहीत. प्रस्तावित केलेल्या हॉकर्स झोनच्या अनेक जागा महापालिका मालकीच्या नाहीत. महापालिकेच्या ताब्यात नाहीत. सुचविलेल्या जागा व्यापार्यांच्या संख्येच्या मानाने अपुर्या आहेत. सर्वांना व्यवसाय करणे अशक्य आहे. हा विषय अत्यंत गंभीर व गुंतागुंतीचा आहे. कमी वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नाही. हॉकर्स, नो-हॉकर्स झोनबाबत प्रशासन व फेरीवाले यांच्यात समन्वयाने निर्णय होणे गरजेचे आहे. एकतर्फी झोन रेटण्याचा प्रयत्न झाल्यास विरोध राहील, असा पवित्रा फेरीवाले समितीतील प्रतिनिधींनी घेतला. दरम्यान, हॉकर्स, नो-हॉकर्स झोन व फेरीवाले धोरणांची अंमलबजावणी एकतर्फी होण्याचा प्रश्न नसल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले. महापालिका प्रशासन व फेरीवाले समिती यांच्यात एकमत होणार्या झोनची प्रथम अंमलबजावणी होईल. एकमत न होणार्या झोनबाबत स्वतंत्र बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. फेरीवाले समितीची पुढील बैठक सोमवारी होणार आहे.
दरम्यान, फेरीवाले समितीच्या आजच्या बैठकीकडे फेरीवाले, भाजीपाला, फळ विक्रेत्यांचे लक्ष लागले होते. सुमारे तीनशेहून अधिक फेरीवाले, विक्रेते महापालिकेच्या शाळा नंबर एक समोर एकत्रित आले होते. महापालिकेतील फेरीवाले समितीची बैठक झाल्यानंतर समितीतील चर्चेची व निर्णयांची माहिती फेरीवाले, विक्रेत्यांसमोर ठेवली. यावेळी जनसेवा भाजीपाला विक्रेता संघटनेचे शंभूराज काटकर तसेच फेरीवाले समिती सदस्य उपस्थित होते.