

नेर्ले : पाणी योजनेतील तांत्रिक त्रुटीमुळे वारंवार खंडित होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या पेठ (ता. वाळवा) व परिसरातील ग्रामस्थांनी पेठ-सांगली महामार्ग सुमारे दोन तास रोखला. प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावची पाणी योजना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे रस्ता रोको करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
पेठ, अभियंतानगर, विष्णूनगर, पेठभाग, गोळेवाडी, कापूरवाडी, जांभूळवाडी आदी परिसरातील 20 ते 22 हजार नागरिक या पाणी योजनेवर अवलंबून आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने योजना कागदोपत्री पूर्ण दाखवली असली तरी प्रत्यक्षात ती अपूर्ण आणि दोषपूर्ण आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून या योजनेचे सर्वेक्षण केले.
पेठ व परिसरात महिन्यातून कसाबसा 10 ते 15 दिवस पाणी पुरवठा होतो. इतर वेळी ग्रामपंचायतीचा वेळ जलवाहिन्याची गळती, व्हॉल्व्हची त्रुटी काढण्यातच जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वारंवार भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी संतप्त झालेले नागरिक पेठच्या बाजारपेठेत जमले. तेथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सुमारे 1 किलोमीटर चालत मोर्चा नाक्यावरील पेठ-सांगली रस्त्यावर आला. आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मारला. यामुळे वाहतूक खोळंबली. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांचा बंदोबस्त होता.
यावेळी मोर्चासमोर बोलताना राजारामबापू कारखान्याचे संचालक अतुल पाटील म्हणाले, पूर्वीची योजना वारणा नदीवरून असताना तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी कृष्णा नदीवरील जॅकवेलमधून पाणी घेण्याचा निर्णय घेतला. तसेच 1978 साली 12 इंची असलेली मूळ पाईपलाईन 2018 मध्ये केवळ 8 इंची करण्यात आली. हा बदल संशयास्पद आहे. गावातील अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात आलेले पाईप्स निकृष्ट आहेत. वेगवेगळ्या भागात सातत्याने गळती होत आहे.
यावेळी ॲड. एस. यू. संदे , विद्या शेटे, मंगल कदम, संगीता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच डॉ. सुभाष भांबुरे, उपसरपंच रविकिरण बेडके, विजय पाटील, संदीप पाटील, संपतराव पाटील, हेमंत पाटील, अरुण पवार, रविकिरण बेडके, जयंत पाटील, अनंतकुमार पवार, तुळशीदास पिसे, अविष्कार पवार, माणिक देशमाने, अशोक पाटील, महादेव पाटील, अरूण कदम, शिवराज पाटील, उपस्थित होते.