

सुनील माने
ईश्वरपूर : ईश्वरपूर शहरासह परिसरात तसेच पेठ - सांगली रस्त्यावर वाहनांना प्रखर वाहनदिव्यांचा वाढता वापर, वाहतुकीचे नियम न पाळणे आणि सुसाट वेगाने वाहन चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. अनेक वाहनधारक आपल्या वाहनांतील अधिकृत कंपनीचे दिवे काढून तथाकथित मिरची बल्ब बसवित आहेत.
या बल्बमुळे समोरून येणार्या वाहनचालकाच्या डोळ्यांवर तीव्र प्रकाशझोत पडत असल्यामुळे रस्ता दिसेनासा होतो आणि अपघाताची शक्यता वाढते. नियमांनुसार समोर वाहन आले की डीपर वापरणे बंधनकारक असले तरी शहरात व ग्रामीण भागात अनेकजण हा नियम पाळताना दिसत नाहीत.
वाहतुकीचे नियम न पाळण्याची ही वाढती प्रवृत्ती केवळ शहरापुरती मर्यादित नसून महामार्ग, डोंगरी रस्ते आणि वळणदार घाटमार्गावर ती अधिक धोकादायक ठरत आहे. डोंगरी भागात तर डीपर न मारल्यामुळे अनेक वाहनचालकांना समोरचे न दिसल्याने वाहने कठड्यात घुसणे अथवा खाली दरीत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सुसाट वेग, प्रखर हाय-बीम लाईट आणि डीपर न वापरणे, ही तिन्ही कारणे मिळून अनेक गंभीर अपघातांची कारणे ठरत आहेत. वाहतूक विभागाने अशा वाहनांवर तातडीने कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.
ईश्वरपूर शहरात उलट्या दिशेने येणार्या वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता वाढली आहे. वाहने चुकीच्या दिशेने चालवणार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच रात्री वाहन बिघडल्यानंतर वाहनधारकांनी वाहनाची हॅझर्ड लाईट (उघड-झाप) सुरू ठेवणे आवश्यक असते, मात्र अनेक जण याचे पालन करत नाहीत. उलट, रस्त्यात दगड ठेवून वाहन दुरुस्ती केली जाते आणि दुरुस्ती झाल्यानंतर हे दगड काढले जात नाहीत, ज्यामुळे पुढील वाहनांना मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळे अनेक अपघात होत असून अनेकांचा बळीही गेला आहे.
सध्या तर ऊस वाहतूक सुरू आहे. रात्री उसाने भरलेल्या ट्रॉलीमुळे मागील वाहनांना समोरचे काहीच दिसत नाही. गेल्या चार दिवसांपूर्वी पेठ- इस्लामपूर या नव्या रस्त्यावर दुचाकीस्वार ट्रॉलीवर आदळून अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ध्वनी प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर होत आहे. चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे चालक अनावश्यक हॉर्न वाजवतात, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
हॉर्नचा वापर केवळ आवश्यक प्रसंगीच करण्याची गरज आहे. वाहनचालकांना नियमांचे प्रशिक्षण, जनजागृती अभियान आणि तांत्रिक तपासण्या नियमितपणे झाल्यास अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकणार आहे. वाहतुकीतील शिस्त राखण्यासाठी वाहतूक विभाग, पोलिस प्रशासन आणि नागरिक यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.