

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड (एम) ग्रामपंचायतीने पंचायतराज अभियानात सहभाग घेत आदर्शवत कार्य करून राज्यभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बायोमेट्रिक पद्धतीने ग्रामसभा घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरण्याचा मान अलकुड (एम) ग्रामपंचायतीला मिळाला आहे.
ग्रामपंचायतीतर्फे विविध विकास योजनांचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे व मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमास जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे, गटविकास अधिकारी उल्हास भांगे, गटशिक्षणाधिकारी विश्वास साबळे, विविध खात्यांचे अधिकारी, सरपंच बापूसाहेब तंगडे, उपसरपंच शोभा पाटील, सदस्य भानुदास पाटील उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्यात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे, ग्रामपंचायतीची अधिकृत वेबसाईट, कापडी पिशव्या, वेंडिंग मशीन तसेच विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट डिजिटल आयडी कार्ड यांचे उद्घाटन करण्यात आले. सरपंच बापूसाहेब तंगडे यांनी गावातील विकास कामांची माहिती दिली. गटशिक्षणाधिकारी विश्वास साबळे यांनी गावाने पुढाकार घेऊन शाळा समृद्ध केली याबाबत माहिती दिली. माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सुमारे 1 लाख 40 हजार रुपयांचा शैक्षणिक निधी उभारून टीव्ही, संगणक व विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट आयडी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत मार्गदर्शन केले. नरवाडे यांनी, ग्रामस्थांनी अधिक जोमाने काम करून पाच कोटी रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवावे, अशा शुभेच्छा दिल्या. संदीप घुगे यांनीही ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले. मुख्याध्यापक हणमंत पाटील यांनी स्वागत केले. ग्रामसेवक सुधीर बनसोडे यांनी आभार मानले.