

पलूस : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पलूस तालुक्यात शुक्रवारी सकाळपासूनच मतदारांचा मोठा उत्साह दिसून आला. पलूस येथील प्राथमिक शाळा क्रमांक एक, दोन व तीन, पंडित विष्णू दिगंबर मतदान केंद्र आणि भिलवडी येथील शिक्षण संस्थेच्या केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत पलूस तालुक्यात पदवीधर मतदारसंघासाठी ५७.६० टक्के, तर शिक्षक मतदारसंघासाठी ८१ टक्के मतदान नोंदवले गेले.
सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या काही तासांत मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी बारापर्यंत सुमारे २० टक्के मतदान झाले होते. त्यानंतरही मतदारांची ये-जा दिवसभर कायम होती. पंडित विष्णू दिगंबर मतदान केंद्रावर आमदार अरुण लाड, भाजपचे प्रदेश सचिव शरद लाड आणि यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी आपले मतदानाचा हक्क बजावला.
नेत्यांच्या मतदान केंद्रांना भेटी
पलूस तालुक्यातील मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यामध्ये आमदार अरुण लाड, भाजपचे प्रदेश सचिव शरद लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव नलवडे, पलूस-कडेगावचे प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर, पक्षनिरीक्षक व नगरसेवक गणेश पाटील आणि भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद पाटील यांचा समावेश होता. या नेत्यांनी पलूस येथील प्राथमिक शाळा मतदान केंद्र, पंडित विष्णू दिगंबर मतदान केंद्र तसेच भिलवडी शिक्षण संस्थेतील मतदान केंद्राला भेट दिली.
महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारासाठी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख, नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते दिगंबर पाटील, सागर सुतार, सुभाष सुतार, संजय गोंदील, गणेश नलवडे, नगरसेवक अमृत माळी आणि धनाजी कुंभार यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रचारमोहीम राबवली.
महाविकास आघाडीकडूनही प्रयत्न
महाविकास आघाडीच्यावतीने आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. कृष्णाकाठ उद्योग समूहाचे अध्यक्ष जे. के. बापू जाधव, महेंद्र लाड, सुहास पुदाले आणि भरत इनामदार यांनीदेखील प्रचारासाठी प्रयत्न केले होते. तालुक्यातील विविध गावांमधील पदवीधर मतदार मतदानासाठी मोठ्या संख्येने पलूस शहरात दाखल झाले होते. मतदान केंद्रांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वांगीत ‘पदवीधर’साठी ४९.७५, तर ‘शिक्षक’साठी ८५ टक्के मतदान
कडेगाव तालुक्यातील वांगी येथील मतदान केंद्रावर पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार पडली. या निवडणुकीत वांगी येथील केंद्रावर पदवीधर मतदारांनी ४९.७५ टक्के, तर शिक्षक मतदारांनी तब्बल ८५ टक्के मतदान करून आपला हक्क बजावला.
शिक्षक मतदारांचा या प्रक्रियेत अत्यंत लक्षणीय प्रतिसाद पाहायला मिळाला. शिक्षक मतदारसंघासाठी एकूण १२० मतदार नोंदणीकृत होते, त्यापैकी १०२ जणांनी प्रत्यक्ष मतदान केले. त्यामुळे या ठिकाणी ८५ टक्केवारी नोंदवली गेली. तसेच, पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ५,२३६ मतदारांपैकी २,६०५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला, ज्याची टक्केवारी ४९.७५ इतकी झाली. सुरुवातीला मतदान प्रक्रिया काहीशी संथगतीने सुरू होती; परंतु दिवसभर केंद्रावर शांतता व सुव्यवस्था कायम होती. कोणतीही अनुचित घटना न घडता मतदान सुरळीत पार पडले. ही प्रक्रिया व्यवस्थित आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन बंदोबस्त ठेवण्यात आला होता.