Sangli News| राजस्थानातील घटनेचा पलूसमध्ये तीव्र निषेध

अल्पवयीन तरुणीवरील अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ सवपक्षीय मूक मोर्चा
Sangli News|
राजस्थानातील घटनेचा पलूसमध्ये तीव्र निषेध
Published on
Updated on

पलूस : देशात किंवा कोणत्याही राज्यात मुलींवर होणारा अत्याचार हा केवळ एका मुलीवरचा अन्याय नसून संपूर्ण समाज, कायदा आणि मानवतेचा अपमान आहे. अशा घटना रोखण्यासाठी समाजाने मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे मत युवा व्याख्याते संदीप कुडचीकर यांनी व्यक्त केले.

राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे एका अल्पवयीन तरुणीवर ३२ नराधमांनी केलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ पलूस शहरात सर्वपक्षीय कार्यकर्ते, महिला व विद्यार्थ्यांचा विराट मूक मोर्चा काढण्यात आला. कुंडल वेशीपासून सुरू झालेली ही मूक रॅली मुख्य बाजारपेठेतून शिवतीर्थ येथे पोहोचली. त्यानंतर या रॅलीचे निषेध सभेत रूपांतर झाले, यावेळी कुडचीकर बोलत होते. या मोर्च्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस, शिवसेना या पक्षांसह विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

पलूस नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दिगंबर पाटील म्हणाले, निष्पाप तरुणीवर अत्याचार करून तिचे आयुष्य संपवणाऱ्या नराधमांवर प्रशासनाने कठोरातील कठोर कारवाई करावी. राष्ट्रवादीचे नेते प्रदीप कदम यांनी, महिला सबलीकरण आणि ५० टक्के आरक्षणाच्या घोषणा होत असताना अत्याचाराच्या घटना वाढणे चिंताजनक असल्याचे सांगितले. यावर कडक कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे असून शिक्षक, पालक व समाजाने मुलींमध्ये आत्मविश्वास स्वसंरक्षणाची भावना निर्माण करावी, असे ते म्‍हणाले.भाजपाचे नेते, उद्योजक सर्जेराव नलवडे यांनी, वाढत्या गुन्ह्यांमागे सोशल मीडियाचा अतिवापर कारणीभूत असल्याचे सांगत मुला-मुलींनी यापासून लांब राहण्याचे आवाहन केले.

सभेत नगरसेवक धनाजी कुंभार, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष गिरीश गोंदील, माजी नगरसेवक दिलीप जाधव, मुख्याध्यापक आनंदराव सावंत, डॉ. मीनाक्षी सावंत आणि अनेक विद्यार्थिनींनी विचार मांडले. सभेनंतर तहसीलदार दीप्ती रिठे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष रोहित दळवी, कपिल गायकवाड, सागर सुतार, रावसाहेब गोंदील, डॉ. अजित राडे, डॉ. प्रशांत देशमुख, संजय शिंदे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, नागरिक उपस्थित होते. नगरसेवक दिगंबर पाटील यांनी संयोजन केले, तर दाजी सिसाळ यांनी सूत्रसंचालन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news