पलूस कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध; परंपरा कायम

पलूस कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध; परंपरा कायम

पलूस; पुढारी वृत्तसेवा : पलूस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागेसाठी लागलेल्या निवडणुकांसाठी बिनविरोधची परंपरा कायम राखत निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये काँग्रेस – १० ,भाजपा -३ , राष्ट्रवादी -३ , स्वाभिमानी विकास आघाडी -१ , स्वाभिमानी शेतकरी संघटना -१ अश्या जागावाटप करण्यात आल्या.

निवडणूक लागल्यानंतर सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यावेळची निवडणूक होणार की, बिनविरोध होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. जागावाटपा वरून राष्ट्रवादीने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. अखेर शेवटच्या क्षणी निवडणूक बिनविरोध झाली.

पलूस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेपासून निवडणूक बिनविरोध होऊन, याठिकाणी कॉंग्रेस पक्षाची सत्ता कायम आहे. दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम, ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजीत कदम ,जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या नेतृत्वात पहिल्यापासूनच काँग्रेस पक्षाची बाजार समितीमध्ये सत्ता आहे. गेल्या वेळी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी सहित सर्व पक्षांनी निवडणूक नको म्हणून तडजोड केली होती

बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने तीनही पक्षांनी सर्वच जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले होते.स्वाभिमानीसह काही संघटनांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. एकूण १८ जागांसाठी तब्बल १३९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.
अंतिम यादीनुसार बाजार समितीचे १ हजार १३५ सभासद आहेत. पलूस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागेसाठी सोसायटी गटातून ११, ग्रामपंचायत गटातून ४, व्यापारी गटातून २, तर हमाल गटातून १ जागा आहेत.

निवडणुकीसाठी भाजपाकडून ४२ ,राष्ट्रवादीकडून २९ ,स्वाभिमानी शेतकरी संघटना ८ ,शेतकरी संघटना ६ तर काँग्रेसकडून ४८ तर अन्य शेतकरी गटातून उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा ,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड ,कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे के जाधव ,स्वाभिमानी विकास आघाडीचे निलेश येसूगडे, किरण लाड ,जिल्हा परिषदे चे गटनेते शरद लाड,भाजपाचे सुरेंद्र चौगुले यांनी प्रयत्न केले.

बिनविरोध उमेदवार असे –

  • विकास सर्वसाधारण गट – संजय भगवान पवार ,शशिकांत विष्णू पवार ,शिवाजीराव कृष्णाजी जाधव , विनोद रघुनाथ देशमुख ,अनिल कलगोंडा राजोबा ,शामराव राऊ धुमके ,महावीर नेमचंद किनीकर
  • विकास महिला गट- जयश्री दिनकर पाटील ,जयश्री प्रकाश पाटील
  • इतर मागासवर्गीय गट- तोफिक जहांगीर मुल्ला
    भटक्या विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग गट- सुदीप दऱ्याप्पा गडदे
  • ग्रामपंचायत सर्वसाधारण गट- सतपाल ज्ञानू साळुंखे ,इंद्रजीत बाजीराव पाटील
  • ग्रामपंचायत अनुसूचित जाती गट- सूर्यकांत शिवाजी शिंदे
  • ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट- प्रल्हाद यशवंत शितापे
  • आडद /व्यापारी गट – कुमार सावंता माळी ,सूर्यकांत महालिंग कटारे
  • हमाल व तोलाईदार गट – संदीप अरुण नलवडे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news