

आटपाडी : थोर साहित्यिक गीत रामायनकर ग . दि . माडगुळकर, थोर साहित्यिक व्यंकटेशतात्या माडगूळकर यांची पणती पलोमा माडगुळकर यांचा इंग्रजी कवितासंग्रह प्रकाशनाच्या निमित्ताने माडगूळकरांच्या चौथ्या पीढीचे साहित्यात पदार्पण होत आहे.माडगूळकरांच्या साहित्यक्षेत्रातील मालिकेतील ही नवी पालवी म्हणावे लागेल.
महाकवि ग. दि. माडगूळकर व व्यंकटेशतात्या माडगूळकर यांनी मराठी साहित्य अजरामर केले.त्यांचे साहित्य सातासमुद्रापार पोहोचले.मराठी साहित्य रसिकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले. माडगूळकरांच्या पुढच्या पिढ्यांनीही साहित्य, राजकारण, माहिती तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटविला.
आता गदिमांची ४ थी पिढी साहित्यक्षेत्रात प्रवेश करते आहे. वयाच्या केवळ १३ व्या वर्षी गदिमांची पणती " कु . पलोमा सुमित्र माडगूळकर " हिच्या द नॅसेंट ब्लॉसम म्हणजेच मराठीत नवी पालवी /नवा बहर या इंग्रजी काव्यसंग्रहाचे प्रकाशन येत्या १९ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता शिवाजीनगर, पुणे येथील मॉडर्न कॉलेजच्या लता मंगेशकर हॉल येथे महाराष्ट्राचे उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते व शिक्षणतज्ञ डॉ. गजानन एकबोटे, इंग्रजी भाषा अभ्यासक विनया बापट, मराठी रसिक यांच्या उपस्थितीत होत आहे.
पलोमा सध्या १३ वर्षांच्या असुन इयत्ता ८ वी मध्ये शिकते आहे. वयाच्या अडीच वर्षांपासून तिला गदिमांच्या मराठी कविता, आठवणी पाठ आहेत, सोशल मीडिया व विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून त्या ती सादर करत असते. तिने १०० पेक्षा जास्त इंग्रजी कविता लिहिल्या असून त्यातील निवडक ४४ कविता आता पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहेत.
ग.दि.मा, व्यंकटेश तात्यांच्या पणतीने अर्थात पलोमाने अत्यंत कमी वयात साहित्य क्षेत्रात दमदार प्रवेश केल्याबद्दल शासननियुक्त ग . दि . माडगुळकर स्मारक समितीचे अशासकीय सदस्य तथा कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष, आटपाडीचे पत्रकार सादिक खाटीक यांनी पलोमाचे अभिनंदन केले आहे .
मृदू, शुद्ध, पवित्र, फुलपाखरू, शांतिदूत असा अर्थ असणाऱ्या पलोमा या स्पॅनिश शब्दाचे नाव धारण करणाऱ्या माडगुळकरांच्या " पलोमाने " अत्यंत कमी वयात साहित्य क्षेत्रात दमदार प्रवेश केल्याबद्दल, सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.