

सांगली : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनाला पाठिंबा देत राज्यातील दहा हजारावर खासगी शाळा शुक्रवार, दि. 5 डिसेंबररोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे, अशी माहिती महामंडळाचे राज्य कोषाध्यक्ष व सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली.
राज्यातील विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी राज्य शासनाने घेतलेल्या विविध अन्यायकारक निर्णयांच्या विरोधात शुक्रवार, दि. 5 डिसेंबररोजी राज्यभर शाळा बंद आंदोलन जाहीर केले आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने राज्यभरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिक्षण संस्था महामंडळाच्या या निर्णयानुसार सांगली जिल्ह्यातील सर्व खासगी शाळा दि. 5 डिसेंबररोजी बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती रावसाहेब पाटील यांनी दिली.