Sangli News : पंचायत समितीवरील डॉ. आंबेडकर नामफलक हटवल्याने संताप

पोलिसांशी वाद; बीडीओंना काळे फासण्याचा इशारा
Sangli News
पंचायत समितीवरील डॉ. आंबेडकर नामफलक हटवल्याने संताप
Published on
Updated on

मिरज : येथील पंचायत समितीच्या नव्या इमारतीला लावलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक शनिवारी हटवण्यात आल्याचे समजताच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पंचायत समिती आवारात जोरदार निदर्शने व घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. काढलेला फलक पूर्ववत न लावल्यास गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) काळे फासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

मिरज तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या नव्या इमारतीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामफलक लावला होता. मात्र, शनिवारी प्रशासनाकडून हा फलक हटवण्यात आल्याचे समजताच कार्यकर्ते संतप्त झाले. पंचायत समिती आवारात दाखल झाले. तेथे फलक नसल्याचे पाहून कार्यकर्त्यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडत घोषणाबाजी सुरू केली.

आंदोलनाची शक्यता गृहीत धरून पंचायत समिती आवारात आधीच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निदर्शनांदरम्यान पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन बाचाबाची झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपाधीक्षक अजय कोकाटे यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा करून त्यांना शांत केले. पंचायत समितीचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यानंतर कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वाराबाहेरच ठिय्या मारून आंदोलन सुरू ठेवले. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक तत्काळ सन्मानाने पूर्ववत लावावा; अन्यथा बीडीओंना काळे फासले जाईल’, असा इशारा दिला.

या आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा नेते श्वेतपद्म कांबळे, बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, विश्वास खांडेकर, वंचित बहुजन आघाडीचे अशोक कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news