

बागणी : वाळवा तालुक्यातील बागणीसह भागात ऑनलाईन जुगार गेमने चांगलेच बस्तान बसवले आहे. कोवळी तरुणाई या ऑनलाईन जुगाराच्या विळख्यात अडकू लागली आहे. पोलिस यंत्रणा मात्र याकडे सोयीस्कररीत्या डोळेझाक करत असल्याने गावातून संतापाची लाट उसळली आहे.
बागणीसह सर्व परिसर तसा शांत आणि शेतीप्रधान भाग आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या भागात जुगार, मटका यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. आता तर बागणी या एकाच गावात डझनभर ठिकाणी संगणकावर ऑनलाईन जुगार खेळण्यात येत आहे. याला विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण बळी पडू लागले आहेत. यात पैशाची लूट होत असल्याने अनेकांना नैराश्य येऊ लागले आहे. अर्थात भागात ऑनलाईन जुगार जोरात सुरू असतानाही याकडे संबंधित विभाग, पोलिस यंत्रणा गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. परिणामी या ऑनलाईन जुगार केंद्र चालकांचे चांगलेच फावले आहे.
ऑनलाईन जुगार खेळण्यासाठी संगणकाचा वापर करण्यात येत आहे. हे सर्व अगदी बिनधास्त सुरू आहे. यात पैसे अथवा वस्तू जिंकण्यासाठी ऑनलाईन गेम्स् खेळण्यात येतात. तसेच कमी वेळेत आणि कमी पैशात जादा पैसे मिळविण्याच्या हव्यासापोटी अनेक तरुण या ऑनलाईन जुगाराच्या भूलभुलैयात गुरफटत आहेत. अशा तरुणांचे पालक मात्र आपले पाल्य काय करत आहेत, यापासून पूर्णपणे अनभिज्ञ आहेत.
दरम्यान, या ऑनलाईन जुगारातील अनेक गेम हे खेळाच्या नावावर खेळले जात आहेत, तर अनेक गेम हे मनोरंजन म्हणून खेळले जात नाहीत, तर त्यात पैशाची मोठी उलाढाल होत आहे. मटक्याच्या खेळात तर सिंगलमध्ये एक रुपयाला 90 पासून डबलला 900 रुपयांपर्यंतचा मोबदला मिळत आहे. या विनासायास पैसे मिळण्याच्या हव्यासापोटी अनेक जण मोठमोठ्या रकमा गमावून अक्षरश: कर्जबाजारी झाले आहेत. भागातील अनेकजण ऑनलाईन जुगारामुळे कर्जबाजारी होऊ लागले आहेत. मात्र याकडे स्थानिक नेतेमंडळींचे लक्ष कसे जात नाही, असा कुतूहलजनक प्रश्न पापभिरू गावकरी बांधव उपस्थित करू लागले आहेत. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन बागणीसारख्या गावात रुजत असलेली ऑनलाईन जुगाराची आणि मटक्याची विषवल्ली पोलिसांनी वेळीच मुळासकट उपसून टाकण्याची मागणी भागातून होऊ लागली आहे.