

कासेगाव : पुढारी वृत्तसेवा
पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील एकाचा अज्ञाताकडून गोळ्या घालून खून करण्यात आला. पांडुरंग भगवान शिद (वय 43) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी शेतात घडली. खुनानंतर हल्लेखोर उसातून पसार झाले. याप्रकरणी कासेगाव पोलिस ठाण्यात शशिकांत महादेव शिद यांनी फिर्याद दिली.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पांडुरंग शिद हे शुक्रवारी सकाळी शेतात काम करण्यासाठी निघाले होते. शिद मळ्याजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोराने पांडुरंग शिद यांना अडविले व पिस्तूलमधून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये पांडुरंग जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळले. अति रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी उसातून पलायन केले. ही हत्या पैशाच्या देवाण-घेवाणीतून झाली असल्याचे शशिकांत शिद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेची माहिती कळताच ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या खुनाच्या घटनेने कासेगाव परिसर हादरून गेला आहे. हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. तपास कासेगाव पोलिस करीत आहेत. पांडुरंग शिद शेती करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, आई असा परिवार आहे.