

सांगली : नीट परीक्षेच्या उमेदवारांना जादा गुणांचे आमिष दाखवून प्रत्येकाची 90 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने सांगली जिल्ह्यातील एका शहरात छापा टाकून एकाला ताब्यात घेतले. या कारवाईबाबत गोपनीयता पाळण्यात आली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत अधिकृत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नव्हता.
याबाबत अधिक माहिती अशी की, नीट घोटाळाप्रकरणी सीबीआयने 9 जूनला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून ‘नीट-युजी 2025 परीक्षेच्या गुणांमध्ये फेरफार करू शकतो’, असे भासवून संशयितांनी प्रत्येक उमेदवाराकडे 90 लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती प्रत्येक उमेदवारासाठी 87 लाख 50 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार सीबीआयने तांत्रिक तपास सुरू केला आहे. याप्रकरणी सोलापूर व नवी मुंबईतील दोन संशयितांची नावे समोर आली आहेत. संशयितांनी अनेक विद्यार्थी व पालकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार सीबीआयने दोघांची माहिती काढली. त्यानुसार मुंबई, सोलापूर आणि सांगलीत छापेमारी केली. सांगली जिल्ह्यातील एका शहरातून एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याला या प्रकरणात सहआरोपी करण्यात आल्याचे समजते.
संशयित हा एका शिक्षण संस्थेचा सल्लागार असल्याचे समजते. त्याच्या मोबाईलची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी केली असता, संभाव्य उमेदवारांची यादी, त्यांचे पट क्रमांक, प्रवेशपत्र, ओएमआर शीट तसेच आर्थिक व्यवहारांचे पुरावे सापडले असल्याचे समजते. लवकरच त्याला मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.