महायुती सरकारला मतदानात भरभरून यश मिळवून देणारी ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सांगली जिल्ह्यातील याचे सात लाख 25 हजार लाभार्थी असून, त्यातील सुमारे सहा लाख 50 हजार महिलांना नोव्हेंबरअखेरचे मानधन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. या योजनेचे आतापर्यंत सुमारे 388 कोटी रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता निवडणुकीची आचारसंहिता संपली असून, नव्या शासनाच्या आदेशानुसार पुन्हा नव्याने यासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. सध्या या योजनेची वेबसाईट बंद आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वर्षांच्या लाभार्थी महिलांना दरमहा आर्थिक साहाय्य देण्यात येत आहे.
सांगली जिल्ह्यातील सुमारे सात लाख 30 हजार महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला. यामधील सात लाख 25 हजार महिला या योजनेच्या लाभार्थी ठरल्या आहेत. अर्ज मंजूर झालेल्यांपैकी सुमारे सहा लाख 50 हजार महिलांच्या खात्यात चार महिन्यांचे म्हणजे सुमारे 388 कोटी रुपये जमा केले आहेत. सुमारे 75 हजार महिलांचे अर्ज निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कात्रीत अडकले आहेत. आता आचारसंहिता स्थगित झाली असली, तरी शासनाचा आदेश आल्यानंतरच उर्वरित महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नवे अर्ज स्वीकारणेही आता शासनाच्या आदेशानुसार सुरू करण्यात येणार आहे.
‘लाडकी बहीण’साठी एकूण अर्जदार सुमारे सात लाख 30 हजार. यापैकी सात लाख 25 हजार महिला ठरल्या पात्र.
सहा लाख 50 हजार महिलांना 388 कोटी मिळाले.
75 हजार महिलांना शासनाच्या आदेशानंतर पैसे मिळणार.
शासनाच्या आदेशानंतर नव्याने अर्ज स्वीकारणार, सध्या वेबसाईट बंद.
या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातील.
21 ते 65 वर्षांच्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येते.
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.
कुटुंबाचा कोणताही सदस्य आयकरदाता नसावा.
महिलांचे सक्षमीकरण करणे.
महिलांची आर्थिक स्थिती सुधारणे.
महिलांना स्वावलंबी बनवणे.
कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे.