

सांगली : पुढारी वृत्तसेवा
पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गज्या मारणे याची सांगली कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. गज्या मारणे याला सांगली कारागृहात आणण्यात आल्यामुळे सांगली कारागृहात पश्चिम महाराष्ट्रातून बंदोबस्त मागविण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्याला कोथरूडमध्ये मारहाण केल्याप्रकरणी गज्या मारणे याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करून त्याला पुणे पोलिसांनी अटक केली होती.
गज्या मारणेवर मोका अंतर्गत कारवाई केल्यामुळे त्याची आता सांगली कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सांगली कारागृहात चार बॅरॅक असून याच बॅरॅक मध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. परंतु असे असले तरी गज्या मारणे याला ज्या बॅरॅक मध्ये ठेवण्यात आले आहे, त्या बॅरॅक बाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे कारागृह प्रशासन देखील आता अलर्ट मोडवर आले असून कारागृहातील सर्व वॉच टॉवरवर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच कारागृहाच्या भिंतीवर कार्यान्वित असणारे इलेक्ट्रिक करंट कुंपण देखील अधिक कार्यक्षमतेने कार्यान्वित करण्यात आले आहे.