Sangli mayor election: महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी आज अर्ज

महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवार, दि. 4 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे
Sangli Municipal Corporation
Sangli Mayor electionPudhari
Published on
Updated on

सांगली : महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवार, दि. 4 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. भाजपकडून महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी यांचे नाव निश्चित झाले आहे. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार उपमहापौर पद राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला मिळणार आहे. या पदासाठी शहर जिल्हाध्यक्षांकडून पाच नावे प्रदेश राष्ट्रवादीकडे पाठवण्यात आली आहेत. त्यापैकी एका नावाची घोषणा बुधवारी सकाळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून होणार आहे.

काँग्रेसने मात्र अद्याप महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज नेलेला नाही. महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक काँग्रेस लढणार का?, याविषयी पक्षातील प्रमुख पदाधिकारी, नगरसेवकांमध्ये संभ्रम आहे. महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीसाठी विशेष सभा दि. 10 फेब्रुवारीरोजी सकाळी 11.30 वाजता महापालिका मुख्यालयात पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दि. 4 फेब्रुवारीरोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीसाठी भाजपकडून गटनेते संदीप आवटी यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज नेले होते. भाजपकडून महापौर पदासाठी निश्चित झालेले उमेदवार धीरज सूर्यवंशी यांनी मंगळवारी अर्ज नेला. उमेदवारी अर्जाची मुदत संपण्याच्या आदल्या दिवसअखेर काँग्रेसने एकही अर्ज नेलेला नाही.

महापालिकेत भाजपला 78 पैकी सर्वाधिक 39 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 18, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 3, शिवसेनेला 2 जागा मिळाल्या आहेत. महापालिकेत सत्तास्थापनेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची युती झाली आहे. त्यामुळे संख्याबळ 55 झाले आहे. याशिवाय शिवसेनाही सोबत आहे. त्यामुळे महायुतीकडे तगडे बहुमत आहे. महायुतीच्या सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यानुसार महापौर पद भाजपला, उपमहापौर पद राष्ट्रवादीला मिळणार आहे. स्थायी समितीचे सभापती पदही भाजपकडेच राहणार आहे. महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी, निरंजन आवटी, अतुल माने, रोहिणी पाटील, स्वाती शिंदे यांचे नाव इच्छुकांच्या यादीत होते. मात्र महापौर पदासाठी पहिले सव्वा वर्ष धीरज सूर्यवंशी यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज बुधवारी सकाळी दाखल होईल.

बॅग भरो, निकल पडो; भाजपचे नगरसेवक आजपासून सहलीवर भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांची बैठक बुधवारी सकाळी 10 वाजता येथील एका हॉटेलमध्ये होणार आहे. यामध्ये भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराचे नाव घोषित केले जाणार आहे. त्यानंतर महापालिकेत उमेदवारी अर्ज दाखल होईल. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर भाजपचे सर्व नगरसेवक सहलीवर जाणार आहेत. बुधवारी सकाळी भाजपच्या बैठकीला येताना बॅग भरून घेऊन या, अशा सूचना नगरसेवकांना दिलेल्या आहेत.

काँग्रेसमध्ये संभ्रम; एकमत होईना

महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी अजित पवार युती झाली आहे. या युतीत शिवसेनाही असणार आहे. त्यामुळे महायुतीचे संख्याबळ 57 होते. विरोधी काँग्रेसकडे 18 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे 3, असे एकूण 21 संख्याबळ आहे. काँग्रेसने मंगळवारअखेर महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज नेला नव्हता. महापौर, उपमहापौर या दोन्ही पदांसाठी काँग्रेसनेच उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असा मतप्रवाह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात दिसत आहे. मात्र काँग्रेसचा अजून गटनेताही निश्चित झालेला नाही. महापौर, उपमहापौर पदाचा उमेदवार कोण असणार, हेही निश्चित झालेले नाही. स्थायी समितीत कोण जाणार, स्वीकृत नगरसेवक कोण होणार, हे सर्व निश्चित करूनच गटनेता निवड व्हावी, अशा अटी, शर्तींमुळे काँग्रेसचे घोडे अडले आहे.

ही 5 नावे मुंबईला; पण...

महायुतीतर्फे उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून अभिजित भोसले, साक्षी बोरगावे, गजानन मगदूम, रेश्मा चौधरी, शिरीन पीरजादे इच्छुक होते. त्यांचे नाव प्रदेश राष्ट्रवादीकडे गेले आहे. दरम्यान, स्थायी समिती सभापती पद राष्ट्रवादीला पहिली तीन वर्षे मिळणार नसल्याने उपमहापौर पदाच्या शर्यतीत विष्णू माने हे ज्येष्ठ नगरसेवकही आले आहेत. अतहर नायकवडी, करण जामदार यांचेही नाव आले आहे. दरम्यान, विष्णू माने हे ज्येष्ठ नगरसेवक असल्याने त्यांचे नाव निश्चित होऊ शकते, असे राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news