

ऐतवडे बुद्रुक : वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक, शेखरवाडी गावांसाठी एक उपकेंद्र आहे. मात्र अनेक महिन्यांपासून या ठिकाणी कायमस्वरूपी आरोग्यसेविका नाही. त्यामुळे ग्रामस्थांना खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत आहे. ‘आरोग्य सेविका नाही गावाला, उपकेंद्र नावाला’, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
चिकुर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 21 हजार 800 ग्रामस्थांना आरोग्य सेवा दिली जाते. डोंगरवाडी, देवर्डे, करंजवडे, चिकुर्डे, ठाणापुडे, ऐतवडे बुद्रुक, शेखरवाडी अशा सात गावांसाठी चिकुर्डे, करंजवडे, ऐतवडे बुद्रुक अशी तीन उपकेंद्रे येतात. यामध्ये दोन उपकेंद्रात आरोग्य सेविका, आरोग्य सेवक पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. वातावरणात अचानक बदल होत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, घशात दुखणे आदी आजारांमध्ये ग्रामीण भागामध्ये वाढ झाली आहे. वातावरण बदलामुळे शरीरावर परिणाम दिसून येत आहेत. या उपकेंद्रात आरोग्य सेविका नसल्याने आशा वर्करच या उपकेंद्राचा कारभार हाकत आहेत. औषधांचाही तुटवडा आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. तरी संबंधित विभागाने तत्काळ या ठिकाणी आरोग्य सेवक आणि सेविका यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.