जातीयवादी काँग्रेसमुळेच देशाचे नुकसान : नितीन गडकरी

Maharashtra Assembly Election : सांगली जिल्ह्यात यापूर्वीच्या नेत्यांनी काय केले ?
Nitin Gadkari
नितीन गडकरी
Published on
Updated on

मिरज ः साठ वर्षे सत्ता भोगलेल्या काँग्रेसमुळेच देशाचे मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेसच मुळात जातीयवादी पक्ष आहे. त्यांनीच समाजात जातीयवादाचे विष पेरले, अशी घणाघाती टीका केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मिरजेतील जाहीर सभेत केली. सांगली जिल्ह्यातील यापूर्वीच्या नेत्यांनी कोणताही विकास का केला नाही? असा सवालही गडकरी यांनी यावेळी केला.

मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार व कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ शनिवारी दुपारी येथील किसान चौकात जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, सांगली जिल्ह्यासह मिरजेचा विकास करण्याचा प्रयत्न सुरेश खाडे यांनी केला. त्यांच्यामुळेच गेल्या दहा वर्षांत 492 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला. सुरेश खाडे यांनी सांगितलेली सर्व कामे मंजूर केली. बारा हजार कोटी रुपयांचा निधी सांगली जिल्ह्याला दिला. अठरा कामांपैकी नऊ कामे पूर्ण झाली आहेत. अजून हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. ती कामे लवकरच सुरू होतील. दहीवडी ते विटा या 52 किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन केले आहे. सांगली ते पेठ रस्त्याचे काम सुरू केले आहे. मुंबई ते बंगळूर हा पंचावन्न हजार कोटी रुपयांचा नवीन रस्ता मंजूर केला आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. यापैकी 74 किलोमीटर लांबीचा रस्ता जिल्ह्यात आहे. हा रस्ता खानापूर ते कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यातून जाणार आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार वाढेल. नवीन विकासाचा मार्ग उलगडणार आहे. नांदेड-सोलापूर-मिरज या मार्गावर नऊ कामे मंजूर झाली आहेत. फलटण-मिरज-कर्नाटक या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

ते म्हणाले, शेतकरी केवळ अन्नदाता नाही, तो इंधनदाताही झाला पाहिजे. इथेनॉलवर चालणार्‍या गाड्या आता येणार आहेत. त्यामुळे प्रदूषणही शून्य होणार आहे. मक्यापासून येथे इथेनॉल बनवले जाते. मक्याचा भाव 1200 वरून 2400 झाला. केवळ शहरेच नाही, तर गावेही स्मार्ट व्हायला पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरू आहे.

गडकरी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांच्या इतिहासात साठ वर्षे काँग्रेसने सत्ता भोगली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता होती. ‘गरिबी हटाव’चा नारा त्यांनी दिला, पण गरिबी काही हटली नाही. काँग्रेसची आर्थिक धोरणे चुकीची होती. रशियाचे इकॉनॉमिक मॉडेल काँग्रेसने त्यावेळेस स्वीकारले. ‘ज्यांचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी’, अशी स्थिती झाली. गावातच विकास झाला असता, तर लोक शहराकडे का गेले असते? काँग्रेसमुळे देशाचे नुकसान झाले. देशात पैशाची नाही, इमानदारीने काम करणार्‍या नेत्यांची गरज आहे. योग्य नीती, योग्य नेतृत्व, योग्य पक्ष सत्तेत असेल, तर देश विकसित होऊ शकतो. या नीती बदलवण्यापेक्षा काँग्रेसने जातिवाद केला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने चुकीचा प्रचार केला होता. संविधान बदलण्याची आमची इच्छा नाही, कुणालाही आम्ही ते बदलून देणार नाही. घटनेची मूलभूत तत्त्वे कोणीही बदलू शकत नाहीत. लोकतंत्र, धर्मनिरपेक्ष, मूलभूत हक्क, स्वातंत्र्य हे बदलू शकत नाही. 1975 मध्ये काँग्रेस व इंदिरा गांधी यांनी घटना तोडली आणि आणीबाणी आली. त्यांनी राज्यघटनेची ऐशी-तैशी केली. आता तेच आमच्यावर उलटा आरोप करीत आहेत. त्यानंतर 1977 ला जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर त्याची दुरुस्ती केली.

ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांची आपण जात बघतो का? या सर्वांनी आपल्याला नवीन विचार दिला. आपण मतदानावेळी जातीचा का विचार करायचा? जनतेच्या भवितव्याचा आणि भविष्याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. आमचे राज्य आले नसते, तर बारा हजार कोटींची कामे सांगली जिल्ह्यात झाली असती का? अनेक नेते सांगली जिल्ह्यात होऊन गेले. त्यांनी या योजना का पूर्ण केल्या नाहीत? त्यांनी आश्वासनांची खैरात वाटली, पण कामे पूर्ण केली नाहीत. चांगला आमदार, मंत्री निवडला, तर तुमच्या आकांक्षा पूर्ण होतील. सुरेश खाडे हे उत्तम नेते आहेत. सगळ्यांनी ताकद आणि शक्ती खाडे यांच्यामागे उभी करावी. जिल्ह्याच्या विकासासाठी सहकार्य करावे.

माजी मंत्री सुरेश खाडे म्हणाले, दुष्काळी भागाला वरदान ठरणारी म्हैसाळ योजना ही सौरऊर्जेवर चालवण्यासाठी पंधराशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. मला मिरजकर जनतेने तीनवेळा निवडून दिले आहे. आता चौकार मारण्याची संधी जनतेने द्यावी. माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले, शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे. चांगले निर्णय घेणार्‍या महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे. जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, ज्येष्ठ नेते सुरेश आवटी, मराठा महासंघाचे विलास देसाई, रमेश शेंडगे, मकरंद देशपांडे, नीता केळकर, माजी महापौर संगीता खोत, माजी नगरसेवक निरंजन आवटी, श्वेतपद्म कांबळे, आनंदा देवमाने, गणेश माळी, योगेंद्र थोरात, पांडुरंग कोरे, शिवसेनेचे विकास सूर्यवंशी, किरणसिंग राजपूत, महेंद्र चंडाळे, युवा नेते सुशांत खाडे, सुमन खाडे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news