

इस्लामपूर : मंत्रिपदाचा, आमदारकीचा गैरवापर करून जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर दबाव आणून उसाला जादा भाव देऊ दिला नाही. त्यांच्या छत्रछायेखाली ऊस उत्पादकांवर झालेल्या अन्यायाला जनता मतपेटीतून उत्तर देईल, अशी टीका महायुतीचे उमेदवार निशिकांत पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता केली. इस्लामपूर मतदार संघातील निवडणूक वेगळ्या पातळीवर पोहचली आहे. महायुतीच्या लोकप्रिय योजनांमुळे महायुतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इस्लामपूर येथे महायुतीच्या सांगता सभेनंतर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भाजपचे राहुल महाडिक, हुतात्मा संकुलाचे नेते गौरव नायकवडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केदार पाटील, भाजपचे नेते विक्रम पाटील, माजी उपनगराध्यक्ष संजय कोरे, जयवंत पाटील, शिवसेनेचे सागर मलगुंडे, काँग्रेसचे विजय पवार, मनसेचे सनी खराडे उपस्थित होते.
निशिकांत पाटील म्हणाले, जे 35 वर्षे आमदार, मंत्री होते, त्यांनी मतदारसंघातील जनतेला फसवले आहे. त्यांच्याकडून आता भावनात्मक राजकारण सुरू आहे. त्यांच्याकडे विकासाचा कोणताही दृष्टिकोन नाही. विकासाचे कोणतेही मुद्दे न मांडता निवडणूक जिंकण्यासाठी भूलथापा मारत आहेत. जनता त्याला बळी पडणार नाही. मतदारसंघात जनतेला बदल हवा आहे. यावेळी शिवसेनेचे आनंदराव पवार, केदार पाटील, गौरव नायकवडी, विक्रम पाटील, संजय कोरे यांनीही भूमिका मांडली. यावेळी प्रसाद पाटील, सतीश महाडीक, माजी नगरसेवक अमित ओसवाल यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.