

सांगली : महानगरपालिका निवडणुकीत बंडखोरी करून निवडणूक लढवत असलेले तसेच पक्षविरोधी काम करत असलेल्या 9 जणांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व व सर्व पदांवरून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी दिली.
पक्षातून निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये माजी नगरसेवक युवराज बावडेकर, भाजपच्या अनुसूचित जाती सेलचे शहर जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटे, माजी नगरसेविका कल्पना कोळेकर, माजी नगरसेविक सोनाली सागरे, रवींद्र ढगे, दीपक माने, अक्षय पाटील, प्रियानंद कांबळे, महेश सागरे यांचा समावेश आहे.
माजी नगरसेवक बावडेकर हे भाजपमधून इच्छुक होते. मात्र उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करून शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडणूक लढवत आहेत. सुजीतकुमार काटे हेही शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात आहेत.
माजी नगरसेविका कल्पना कोळेकर अपक्ष उमेदवार आहेत. माजी नगरसेविका सोनाली सागरे यांचे बंधू महेश सागरे हे शिवसेनेतून निवडणूक लढवत आहेत. शिवसेना प्रचारात त्या सक्रिय झाल्या आहेत. रवींद्र ढगे हेही शिवसेनेच्या उमेदवारीवर लढत आहेत.
दीपक माने, अक्षय पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रियानंद कांबळे हे महाविकास आघाडीच्या प्रचारात आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.