

मांजर्डे : पुढारी वृत्तसेवा
तासगाव तालुक्यातील ग्रामीण भागात चार ते पाच दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट वाढल्याची चर्चा सुरू आहे. काही गावांमध्ये चोर निदर्शनास आल्याचे बोलले जात आहे. या घटनांवर नियंत्रण ठेवण्यास पोलिस प्रशासनाला साथ देण्यासाठी तालुक्यातील तरुणांनी रात्रीच्या वेळी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.तालुक्यात मागील चार ते पाच दिवसांपासून मांजर्डे, आरवडे, वंजारवाडी, ढवळी, विसापूर, तुरचीसह अन्य गावात चोरांचा सुळसुळाट असल्याची चर्चा आहे. काही गावात चोर आल्याची बातमी समजताच तरुण तत्काळ घटनास्थळी दाखल होतात, मात्र चोर तत्काळ पिकांचा आणि रात्रीचा फायदा घेत पळून जातात. त्यामुळे पोलिसांना माहिती देऊनही फारसा फायदा होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
अशा घटनांमुळे गावागावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: वस्ती भागात राहणारे ग्रामस्थ व महिला यांच्यात घबराट पसरली आहे. चोरांपासून गावाला वाचविण्यासाठी पोलिसांच्या मदतीला अनेक गावातील तरुण सरसावले आहेत. रात्री दहा ते पहाटे सहा या वेळेत तरुण गावागावात गस्त घालताना दिसत आहेत.याबाबत सोशल मीडियावर माहिती देणे-घेणेही सुरू आहे. एखाद्या ठिकाणी चोर आल्याची माहिती मिळताच गस्तीवर असणारे तरुण तत्काळ घटनास्थळावर दाखल होत आहेत. चोर सापडले नसले तरी परिसरातील ग्रामस्थांना धीर देण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे.
गावात चोर आल्याचे, त्यांच्याकडून बंद असणारी घरे लक्ष केली जात असल्याची चर्चा आहे. गावामध्ये अनेक फेरीवाले विविध वस्तूंच्या विक्रीसाठी येत असतात. त्यांच्याकडूनच असे प्रकार केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी गावात बाहेरील फेरीवाल्यांना ओळखपत्राशिवाय फिरू देऊ नये, संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.