

सांगली ः खा... प्या... मजा करा, पण जपून, अशा आशयाचे संदेश सोशल मीडियातून पाठवले जात आहेत. सरत्या वर्षाला अलविदा करीत नववर्षाचे स्वागत जल्लोषात करा, पण स्वतःचे आणि समाजाचेही आरोग्य जपा, असे सर्व संबंधित यंत्रणांनीही विशेषतः तरुणांना सांगितले.
थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी शहर परिसरासह जिल्ह्यातील हॉटेल्स, रिसॉर्ट, बिअरबार, ढाब्यांवर अगोदरच बुकिंग झाले आहे. तेथे सर्वत्र सेलिब्रेशनचे वातावरण आहे. त्यासाठी विद्युत रोषणाई केली आहे. हॉटेल्स, बिअरबार चालकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्स दिलेल्या आहेत. खवय्यांसाठी नानाविध नवीन खाद्यपदार्थांच्या डिशेसच्या जाहिरातीही केल्या आहेत. सांगली-मिरजेतील हॉटेल्समध्ये फॅमिली पॅक, जेवणामध्ये सूट, बिअर, मद्यावर स्नॅक्स फ्री आदी ऑफर्स आहेत.
आज, मंगळवारी सायंकाळपासूनच ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 50 ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी केली जाणार आहे. बेशिस्त वाहनचालक, हुल्लडबाजांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. पहाटेपर्यंत पोलिसांचा शहरात बंदोबस्त आणि गस्त असेल.