‌Sangli News : ‘इंद्रायणी‌’ची दमदार एन्ट्री; दराचाही तोरा

सांगलीच्या बाजारपेठेत रोज 30 टन तांदळाची आवक : हंगाम लांबला, तरी उत्पादन चांगले
Indrayani Rice
‘इंद्रायणी‌’ची दमदार एन्ट्री; दराचाही तोराPudhari Photo
Published on
Updated on

मृणाल वष्ट

सांगली : दिवाळीनंतर नव्या तांदळाची आवक सुरू होते. मात्र, यंदा अनियमित पर्जन्यमानाचा परिणाम म्हणून तांदूळ एक महिना उशिरा बाजारपेठेत दाखल झाला. बाकी तांदळाचे दर स्थिर आहेत. इंद्रायणीचा दर मात्र बाजारात येण्यापूर्वीपासूनच चढा आहे. इंद्रायणीची एन्ट्री दमदार झाली, म्हणजे उत्पादन अधिक झाले आहे, आवकही वाढली आहे आणि दराबाबत ‌‘नो कॉम्प्रमाईज‌’ अशी स्थिती आहे. त्यामुळे दर गतवर्षापेक्षा पाच ते दहा रुपये वाढला आहे.

नव्या तांदळाचा हंगाम किमान 30 दिवसांनी लांबला आहे. जुना तांदूळ बाजारपेठेतून संपल्याने नव्या तांदळाची आवक होताच तो संपत आहे. सांगली बाजारपेठेत रोजची 30 टन तांदळाची आवक सुरू आहे. इंद्रायणीसोबतच एचएमटी, कोलम आणि बासमतीलाही पसंती आहे. सामान्य वर्ग एचएमटी आणि कोलम अधिक खरेदी करतो, मध्यमवर्गाची पसंती इंद्रायणी आणि बासमती तुकड्याला आहे, तर उच्च मध्यमवर्गीय अखंड बासमती, आंबेमोहर खरेदी करतो. त्यामुळे प्रत्येक जातीच्या तांदळाला मागणी आहेच, अशी माहिती व्यापारी बाळासाहेब पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे शिराळा तालुक्याचा इंद्रायणी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेच; मात्र वाळवा, पलूस तालुक्याच्या काही भागातही इंद्रायणीचे उत्पादन घेतले जात आहे. यंदा सर्वच तांदळाची मागणी वाढली आहे.

ग्राहकांच्या चवीत बदल

  • इंद्रायणीचा भात मऊ, सुगंधी आणि पचायला हलका असल्याने मागणी वाढते आहे.

  • अलीकडे ग्राहक तांदळाची साठवण अधिक करत नाहीत. प्रत्येकवेळी तांदूळ बदलून बघतात.

  • रोजच्या वापरासाठी इंद्रायणीला पसंती; इतर प्रकारचे भात बनवण्यासाठी बासमतीचा वापर

  • महिन्याच्या किराणा सामानात तांदूळ किमान 5 ते 10 किलो घेण्याकडे कल

  • अधिक काळ तांदूळ साठवून, जुना तांदूळ वापरण्याची पारंपरिक पद्धती संपुष्टात

  • नवा तांदूळ शिजण्यास मऊ असल्याने एचएमटी आणि कोलमलाही पसंती

  • सांगलीतून इंद्रायणीची कर्नाटकात जावक; कर्नाटकातून ‌‘स्टीम राईस‌’ची आवक

सांगली जिल्ह्यात शिराळा तालुका तांदळासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे 10 हजार हेक्टर क्षेत्रात तांदूळ पिकतो. साधारण हजार टन चांगल्या दर्जाचा तांदूळ होतो. इंद्रायणी, रत्ना, पारंपरिक वाणाचा तांदूळही पिकतो. यंदा पारंपरिक आणि सुधारित वाणाचा तांदूळ चांगला पिकला आहे. त्यामुळे तांदळाचे उत्पादन चांगले आहे.
विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news