

सांगली : ‘विष्णुदास भावे गौरवपदक’ मिळणं ही अभिमानाची, भावूक होण्याची गोष्ट तर आहेच, पण आता हे पदक स्वीकारताना याक्षणी मला माझी 55 वर्षांची सारी कारकीर्द आठवतेय. नाटक ही सामूहिक कला आहे आणि मला मिळालेल्या या पदकाचे श्रेयही रंगभूमीसंबंधित सार्यांचे आहे, अशी भावना मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री, नाट्य प्रशिक्षिका नीना कुळकर्णी यांनी व्यक्त केली.
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने देण्यात येणार्या ‘विष्णुदास भावे गौरवपदका’ने नीना कुळकर्णी यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. अ. भा. नाट्य संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्याहस्ते त्यांना हे गौरवपदक प्रदान करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.
कुळकर्णी म्हणाल्या, नाटकासंबंधीचे संबंधित आणि प्रेक्षक यांची एकसंधता जमली तर नाटकात रंग भरतो. पूर्वी आयुष्यही सारं सहज सोपे होते. लोक विश्वास टाकायचे. मीही अगदी सहज फुलपाखरासारखी इथे आले. इकडे-तिकडे फिरत राहिले. अभिनेत्रीच व्हायचे असे काही ध्येय नव्हते. वाचन आणि माणसांच्या भेटी या ध्यासापोटी इथे आले. नाटकात काम करता करताच शिकत गेले. विजया मेहता, दुबे यांच्यासारखे गुरू मिळाले. त्यांच्यामुळे शिस्त अंगवळणी पडली. नाटकासाठी एकाग्रता, सातत्य आणि निवड लागते. यापुढेही रंगभूमीची सेवा करायला मिळावी हीच प्रार्थना, अशी भावना त्यांनी व्यक्तकेली.
डॉ. जब्बार पटेल यांनी विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्काराचा सन्मान हा विद्यापीठाने डॉक्टरेट दिल्यासारखाच आहे, असे सांगितले. आपल्याकडे गुरू-शिष्य परंपरेत कधी गुरू मुस्लिम असायचे आणि शिष्य हिंदू असायचे. गुरूसाठी काहीही करायची तयारी शिष्यांची असायची. गुरू समजून घेऊन अवघड गोष्टी आत्मसात करण्याचे काम शिष्याला करावे लागायचे. नीना कुळकर्णी यांनी ते केल्याचे पटेल यांनी सांगितले. स्वागत समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी केले. भास्कर ताम्हणकर यांनी परिचय करून दिला. धनश्री कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास उपाध्यक्ष विलास गुप्ते, कार्यवाह बलदेव गवळी, कोषाध्यक्षा मेघा केळकर उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात सुरू केलेल्या आंतर कॉलनी एकांकिका स्पर्धा, शास्त्रीय नृत्य महोत्सव, गणेशोत्सवात मोफत कार्यक्रम, या योजना सांगलीतही सुरू करणार असल्याचे सांगितले. दरमहा एक मोफत नाटक दाखवण्याची योजनाही त्यांनी सांगितली, हे सांगताना याचा आणि निवडणुकांचा काही संबंध नाही हेही त्यांनी हसत, हसत सांगितले.
सुखाच्या इंडेक्समध्ये भूतान एक नंबरला, तर आपण 141 नंबरला आहोत. आपला पोटाच्या भुकेचा प्रश्न बराच कमी झाला आहे आणि आता पोटाची भूक भागल्यावर मनाची भूक वाढत चालली आहे. तिसरी भूक आहे बुध्दीची आणि चौथी आत्म्याची. बाकीच्या भुका सोडा, पण आपण मनाची भूक भागवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे ना. पाटील यांनी सांगितले.
विष्णुदास भावे गौरवपदक सोहळ्याचे मला निमंत्रणच नव्हते, पण आमंत्रण नसले म्हणून काय झाले? मी म्हटले आपण ते खेचून आणू. खेचून आणले आणि कार्यक्रमाला आलोच, असे ना. पाटील यांनी सांगितले आणि हास्यकल्लोळ झाला.