

सांगली : अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारे यंदाचे ‘विष्णुदास भावे गौरव पदक’ मराठी बहुआयामी आणि प्रदीर्घ कारकीर्द असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना जाहीर करण्यात आले. गौरव पदक, 25 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 5 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय नाट्य संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी शुक्रवारी येथे ही घोषणा केली.
ते म्हणाले, मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाट्य क्षेत्रात योगदान देणार्या कलावंतास या पदकाने सन्मानित करण्यात येते. यंदाचा हा 58 वा पुरस्कार आहे. तो नावाजलेल्या रंगकर्मी, चित्रपट, नाटक, दूरदर्शन क्षेत्रातील अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शिका नीना कुळकर्णी यांना देण्यात येणार आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी रंगभूमी, तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत त्यांनी योगदान दिले आहे. त्यांनी ‘महासागर, सावित्री, आकस्मात, ध्यानीमनी, सर्वस्वी तुझीच, वटवट सावित्री, आईचं घर उन्हाचं, देहभान, प्रेमपत्र’ आणि ‘असेन मी नसेन मी’ यांसारख्या नाटकांत व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत. तसेच इंग्रजी रंगभूमीवर त्यांनी ‘एज्युकेटिंग रीटा, महात्मा व्हर्सेस गांधी’ आणि ‘वेडिंग अल्बम’ यांसारख्या नाटकांत भूमिका साकारल्या. ‘सवत माझी मुलगी, सरीवर सरी, आई’, तसेच ‘दायरा, दागः द फायर, पुरुष, नायक, गुरू, पहेली, हंगामा, रंग, भूतनाथ, फिर भी दिल अगेन’ यांसारख्या हिंदी चित्रपटांत प्रभावी काम केले आहे. नीना कुळकर्णी यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर मराठी पुरस्कार, नाट्यदर्पण आणि नाट्य परिषद यांसारखे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.