

कडेगाव : गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून ताकारीचे आवर्तन सुरू आहे. सध्या उन्हाची प्रचंड तीव्रता वाढली आहे. पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज आहे. त्यामुळे हे आवर्तन सलग सुरू ठेवण्यात यावे, अशी मागणी शेतकर्यांतून जोर धरत आहे.
यावर्षीचे उन्हाळी आवर्तन दि. 8 मार्च रोजी सुरू झाले असून आजवर ते सुरूच आहे. लाभक्षेत्रातील संपूर्ण शेतीला पाणी देऊन आता हेच पाणी कालव्याच्या उलट्या दिशेने देण्यास सुरू केले आहे. यापूर्वी 20 मार्चअखेर सोडलेल्या पाण्याने वांगी परिसराला दिलासा मिळाला होता. परंतु ताकारी मुख्य कालव्यातून सोडलेल्या पाण्याचे होणारे प्रचंड बाष्पीभवन, शेतकर्यांकडून पिकांसाठी होणारा सतत पाणीउपसा यामुळे जमिनीतील पाणीपातळी खालावली आहे.
खानापूर, तासगाव तालुक्यानंतर आता हे पाणी सध्या कडेगाव तालुक्यात टप्प्या-टप्प्याने कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात कडेगाव, खानापूर व तासगाव तालुक्यांतील शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ताकारी योजनेचे आवर्तन सुरू आहे. परंतु शेवटच्या टप्प्यातील शेतकर्याला पाणी मिळाल्याशिवाय पाणी बंद होणार नाही. सध्या तरी पाणी बंद करण्याची कोणतीही तारीख ठरवलेली नाही. परंतु तांत्रिक दुरुस्तीसाठी पंप बंद करणे गरजेचे आहे. शेतकर्यांना पूर्ण उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही याची काळजी घेणार आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
राजन डवरी, कार्यकारी अभियंता ताकारी उपसा जलसिंचन, देवराष्ट्रे