

कुंडल : दूध उत्पादकांची सर्वच बाजूंनी कोंडी होत आहे. कोणत्याही परिस्थितीत उत्पादकांचे दूध त्याचा दर्जा तपासूनच घेतले जाते आणि त्याचप्रमाणे दुधाचा दर निश्चित केला जातो. मात्र, जो दूध उत्पादक आपले दूध त्याचा दर्जा तपासून मगच विकतो, त्याला पशुखाद्य मात्र दर्जेदार मिळेलच असे नाही किंबहुना पशुखाद्याचा दर्जा तपासणार कोण? हा प्रश्न निर्माण होत आहे.
ग्रामीण भागातील अनेक बेरोजगार तरुण दुग्ध व्यवसायात आपला जम बसवू पाहत होते आणि अचानक दरात मोठी घट झाली. शेतकर्याने उत्पादित केलेल्या कोणत्याही घटकाचा बाजारभाव ठरविण्याचा अधिकार शेतकर्याला नाही हे वास्तव आहे आणि ते स्वीकारून शेतकरी शेतीमाल पिकवत आहे. अगदी दूध उत्पादनही याला अपवाद नाही. दुधाचा दर ठरविण्याचा अधिकार शेतकर्याला नाही. शेतकरी दूध संकलन केंद्रामध्ये आपले दूध घेऊन गेल्यावर त्या दुधाचा नमुना तपासून त्यातील पाण्याचे प्रमाण, प्रोटिन्स, स्निग्धांश आदी तपासण्या करून त्याची फॅट आणि डिग्री तपासूनच त्याचा दर ठरविला जातो. तो प्रत्येक शेतकर्यासाठी वेगवेगळा असतो आणि तपासणीप्रमाणे जो मिळेल तो दर घ्यावा लागतो.
आता पशुखाद्याचे पण उदाहरण चर्चेत आहे. आज बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्या आपल्या पशुखाद्याची उत्पादने विक्री करत आहेत आणि एक शेतकरी जे पशुखाद्य वापरतो, त्याचेच अनुकरण दुसरा शेतकरी करत असतो. मुळातच अनेक पशुखाद्य कंपन्या या दुग्ध व्यावसायिक संस्थांशी सलग्न असतात. अनेक दूध संस्थांची स्वत:ची पशुखाद्य उत्पादने आहेत आणि तीच उत्पादने घेण्यासाठी दुग्ध उत्पादकांवर त्यांच्याकडून अनेकदा सक्तीही केली जाते.