

आष्टा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी प्रशासनाचा निषेध करीत, आष्टा नगरपालिकेवर थेट आपल्या पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचा फलक लावून आंदोलन केले.
पूर्वी भाजपा व सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकार्यांनी शासकीय निधीतून झालेल्या कामांवर बेकायदेशीर फलक लावले असून, ते तत्काळ हटवावेत, अन्यथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते 3 जूनरोजी पालिकेवर राष्ट्रवादी कार्यालय असा फलक लावतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेला निवेदनाद्वारे दिला होता. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले. शहरातील विविध प्रशासकीय आणि स्थानिक समस्या वारंवार कळवूनही नगरपरिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत, कार्यकर्त्यांनी आष्टा शहर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजी चोरमुले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले.
यावेळी शिवाजी चोरमुले म्हणाले, निवेदने, तक्रारी, आंदोलने करूनही पालिका प्रशासनाकडून नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. पालिका प्रशासन जनतेशी संवाद साधत नाही, त्यामुळे आम्हीच पालिकेवर जनसंपर्क कार्यालयाचा फलक लावून आंदोलन करीत आहोत. आंदोलनात माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे, सतीश माळी, अमित ढोले, प्रकाश रुकडे, अनिल पाटील, बाबासाहेब सिद्ध, गुंडा मस्के, राजकेदार आटुगडे, राजू माने, सयाजी गावडे, प्रकाश सिद्ध यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवीण माने यांनी पालिका प्रशासनाकडे निवेदन देऊन, शासकीय निधीतून झालेल्या कामांवर लावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोनशिला तातडीने काढाव्यात, अशी मागणी केली. शासनाचे नियम न पाळता या कोनशिला लावण्यात आल्याने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आता जनतेचे लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रतिआंदोलनाकडे लागून राहिले आहे.