

सांगली ः राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात व्हीपच्या अधिकारावरून नाट्यमय घडामोडी झाल्याची चर्चा आहे. गटनेत्याकडे व्हीपचे अधिकार असणे आवश्यक आहे, मात्र जिल्हाध्यक्षांनी व्हीपचे अधिकार स्वतःकडे घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर व्हीपच्या अधिकाराबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना बदलून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मात्र असे काही घडलेच नाही, अशी माहिती पक्षातील काही नेत्यांनी दिली.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. दि. 10 रोजी पंचायत समिती सभापती, उपसभापती आणि दि. 18 रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड होणार आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे सहा सदस्य निवडून आले आहे. जिल्हा परिषदेतील पक्षाचा गटनेता आणि पक्षप्रतोद निवड शनिवारी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी राजेश्वरी नाईक यांची, तर पक्षप्रतोदपदी स्नेहल मोरे यांची निवड करण्यात आली. गट स्थापन करून गटनेत्याची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात ठरले होते. मात्र व्हीपचे अधिकार जिल्हाध्यक्ष यांच्याकडे असल्याचे नेत्यांच्या लक्षात आले, अशी चर्चा आहे. मात्र नियमानुसार व्हीपचे अधिकार गटनेत्याला प्राप्त होतात. त्यामुळे पक्षातील काहींनी नाराजी व्यक्त केली. नियमानुसार कार्यवाही करण्याची विनंती केली. पत्रातील चुकीबद्दल पुन्हा चर्चा झाली. नेत्यांमधील चर्चेनंतर पत्र बदलून देण्याबाबत सर्वांनीच सहमती दर्शवली. ‘व्हीप’च्या अधिकाराबाबतची चूक प्रशासनाची निदर्शनास आली. त्यांच्याकडून गटनेता अधिकारा-बाबतचे पत्र बदलून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशीही चर्चा आहे. त्यानुसार राष्ट्रवादीकडून गटनेता अधिकाराबाबतचे पत्र बदलून दिले जाणार असल्याची माहिती मिळाली.