

मिरज : विधानपरिषद आमदार इद्रिस नायकवडी यांना राजीनामा देण्याचे आदेश पार्थ पवार यांनी दिल्याची चर्चा आहे. परंतु अशी कोणतीही सूचना कोणीही दिलेली नाही, याबाबत चर्चा झालेली नाही, या केवळ वावड्या असल्याचा खुलासा आमदार नायकवडी यांनी दै. ‘पुढारी’कडे केला.
नायकवडी हे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत जवळचे होते. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधानपरिषदेवर राज्यपालनियुक्त आमदारपदी संधी दिली. परंतु अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील काहीजणांसोबत त्यांचे खटकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पार्थ पवार यांनी नायकवडी यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ओएसडीमार्फत राजीनामा देण्याची सूचना दिल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर नायकवडी यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. ते आमदार जयंत पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली होती.
या सर्व चर्चा वावड्या असल्याचा खुलासा आमदार इद्रिस नायकवडी यांनी केला आहे. राजीनाम्याबाबत कोणतेही तथ्य नाही, यासंदर्भात कोणाशीही चर्चा झाली नाही. तसेच या वावड्यांवरून कोणाला आनंदी होण्याचे कारण नाही. मी कसा आहे हे माझ्या कार्यकर्त्यांना माहीत आहे. त्यामुळे माझे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. राजीनाम्याबाबत केवळ राजकीय वावड्या सुरू असल्याचे सांगत, राजीनाम्याचा काही संबंध नसल्याचे आमदार नायकवडी यांनी सांगितले.