

वारणावती : पडलेलं पौर्णिमेचं टिपूर चांदणं. घनदाट जंगलातून जाणारी पायवाट. आजूबाजूच्या दाट झाडीतून रात किड्यांची ऐकू येणारी किरकिर. अंगाला झोंबणारा गार वारा, उंच मचानावरून दिसणारं विस्तीर्ण जंगल. समोर पाणवठा, तहान भागवण्यासाठी अधूनमधून रात्रभर येणारे वेगवेगळे प्राणी. तितकीच भीती आणि उत्सुकता. मचानावर बसून निसर्गप्रेमींनी रात्रीचं अद्भूत सह्याद्रीचं जंगल अनुभवलं. निमित्त होतं निसर्गानुभव 2025 अर्थात प्राणी गणणेचं.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्रीत व्याघ्रगणनेचे आयोजन केले जाते. यंदा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्या कोयना विभागात कोयना, पाटण, बामनोली, कांदट, तर चांदोली विभागात येणार्या चांदोली, हेळवाक, ढेबेवाडी, आंबा आदी ठिकाणी रात्री आठ ते दहा या वेळेत प्रत्यक्ष मचानावर हे निसर्गप्रेमी पोहोचले. वरील आठ वन परिक्षेत्रात जवळपास 60 मचान उभे करण्यात आले होते. या प्रत्येक मचानावर दोन प्रगणक असे जवळपास 120 प्रगणकांनी ही गणना केली.
रात्रभर मचानावर बसून या निसर्गप्रेमींनी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येणार्या प्राण्यांची नोंद केली. या गणनेत चांदोली तसेच कोयना बीटात अनेक वन्य प्रजातीचे दर्शन निसर्गप्रेमींना झाले. गणनेसाठी नेमलेल्या प्रगणकांच्या निरीक्षणातून आलेल्या नोंदी एकत्रित करून अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एकूण किती प्राणी आढळले याची निश्चिती होणार आहे. यापूर्वी कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वन्यजीवांची गणना केली जात होती.
मात्र सामान्य लोकांना वने व वन्यजीव यांच्याबाबत माहिती मिळावी, पशु-पक्ष्यांची त्यांच्याच घरात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खुणांद्वारे ओळख पटवता यावी, रात्रीचे जंगल, वन्य प्राण्यांचे आवाज, निशाचर प्राण्यांची वर्तणूक इत्यादी रंजक माहिती मिळावी, या उद्देशाने हा निसर्ग अनुभव कार्यक्रम राबवण्यात आला.
निसर्गप्रेमींना गणनेदरम्यान सांबर,भेकर , चितळ , गवे , मोर, खवलेमांजर, ससा, डुक्कर, शेखरू, विविध रंगांची फुलपाखरे, वानरे, माकडे, विविध वनस्पती पाहायला मिळाल्या. बिबट्याची विष्ठा, पायाचे ठसेही आढळून आले. काही ठिकाणी अस्वलाचा आवाज ऐकायला मिळाला.