सांगलीत नॅचरल गॅस पाईपलाईनचे नेटवर्क सुरू : पहिल्या टप्प्यात 4 हजार घरांना गॅस

सात प्रभागातील पाईपलाईनसाठी महापालिकेला प्रस्ताव
Sangli Natural Gas Pipeline Network
सांगली : पाईप्ड् नॅचरल गॅस प्रकल्पांतर्गत कार्यान्वित झालेले दाब नियंत्रण केेंद्र.Pudhari Photo
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा

शहरातील चार प्रभागामध्ये भारत पेट्रोलियमच्या गॅस पाईपलाईनचे नेटवर्क सुरू झाले. सुमारे दहा किलोमीटर पाईपलाईनमधून नॅचरल गॅस यशस्वीरित्या सोडण्यात आला. पंधरा दिवसात पार्श्वनाथनगर, सैनिकनगरमधील 210 घरांना पाईपद्वारे गॅस मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ महिन्यात 4 हजार घरांना गॅस मिळणार आहे. पारंपरिक एलपीजी सिलिंडरऐवजी रहिवासी, व्यवसायांना पाईप्ड् नैसर्गिक गॅस मिळणार आहे. दरम्यान, ‘बीपीसीएल’ने महापालिका क्षेत्रातील सात प्रभागातील गॅस पाईपलाईनसाठी महापालिकेला प्रस्ताव सादर केला आहे.

महापालिका क्षेत्रात पाईप्ड् नॅचरल गॅस प्रकल्प राबविण्याचे काम सुरू आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 20 प्रभाग आहेत. त्यापैकी प्रभाग क्रमांक आठ, नऊ, दहा, सतरा आणि एकोणीस या पाच प्रभागामध्ये पाईप्ड् नॅचरल गॅससाठी सबपाईपलाईन पूर्ण झालेली आहे. घरगुती जोडणीही तयार आहे. दरम्यान, या पाच प्रभागामध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल)ने 10 किलोमीटर एमडीपीई गॅस पाईपलाईन नेटवर्क यशस्वी केले आहे. विजयनगर ते स्फूर्ती चौक, धामणी चौक या परिसरात हे नेटवर्क आहे. पार्श्वनाथनगर, सैनिकनगर येथील 210 घरांना पाईपद्वारे गॅस उपलब्ध होणार आहे. त्यानंतर वानलेसवाडी, सिद्धिविनायकपूरम, ग्रीन एकर सोसायटीसह उर्वरित भागात टप्प्या-टप्प्याने गॅस पुरवठा सुरू होणार आहे. पुढील आठवड्यात धामणी रोडपासून कोल्हापूर रोडपर्यंत तसेच सांगली बसस्थानक ते आदिसागर मंगल कार्यालय तसेच शंभरफुटी रस्त्यावर एकूण 10 किलोमीटर गॅस पाईपलाईनचे नेटवर्क यशस्वी करण्याचे काम पूर्ण होईल.

भारत पेट्रोलियमच्या सांगली शहर गॅस वितरण पथकाने सांगितले की, संपूर्ण कामकाज सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करत पूर्ण करण्यात आले आहे. या प्रक्रियेची सुरक्षित आणि सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात आली. विस्तारित पाईप्ड् नॅचरल गॅस नेटवर्कमुळे सांगली शहरातील नागरिकांचे जीवनमान मोठ्या प्रमाणात सुधारेल. या टप्प्याच्या यशस्वी पूर्णत्वानंतर उर्वरित भागामध्येही विस्तार करण्यात येणाार आहे. पहिल्या टप्प्यात चार ते पाच हजार घरे, व्यवसायांना पाईप्ड् नॅचरल गॅस उपलब्ध होणार आहे. त्याची प्रक्रिया पंधरा दिवसात सुरू होईल व हे काम आठ महिन्यांत पूर्ण होईल. संबंधित घरे, व्यवसायांना पाईपमधून नॅचरल गॅस मिळेल. यावेळी भारत पेट्रोलियमचे अधिकारी रिषभ सिरवैय्या, विशाल कुरणे, के. पूर्णचंद्र रेड्डी आदी उपस्थित होते.

या सात प्रभागात पाईपलाईनसाठी प्रस्ताव...

महापालिका क्षेत्रातील उर्वरित 15 प्रभागामध्ये घरगुती जोडणी पूर्ण केलेली आहे. त्यापैकी प्रभाग क्रमांक एक, दोन, तीन, अकरा, चौदा, पंधरा आणि अठरा या सात प्रभागात सबपाईपलाईन टाकण्याच्या अनुषंगाने महापालिकेला प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहितीही बीपीसीएलच्या पथकाने दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news