

बारामती/सांगली : राष्ट्रीय नेमबाज शरयू संजय मोरे (वय 22) हिचे बारामती येथे अपघाती निधन झाले. सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांची ती कन्या. सातारा जिल्ह्यातील सासुर्वे या मूळ गावी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शरयू हिने नीट परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवत बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. ती एम.बी.बी.एस.च्या दुसर्या वर्षात शिक्षण घेत होती. शनिवारी रात्री ती व तिची मैत्रीण दोघी दुचाकीवरून वसतिगृहाकडे निघाल्या होत्या. बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर ऊर्जा भवनजवळ गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात झाला. यात शरयूचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेली मैत्रीण जखमी झाली.
दिल्ली येथे झालेल्या 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत शरयू आणि तिचा भाऊ आदित्य या दोघांनीही निष्णात (रिनाऊंड शूटर) होण्याचा बहुमान मिळवला होता. या स्पर्धेत देशभरातून हजारांवर खेळाडू पात्र ठरले होते. खडतर समजल्या जाणार्या 12 बोअर शॉटगन-ट्रॅप या क्रीडा प्रकारात तिने देदीप्यमान यश मिळविले होते. विजेतेपद मिळवून निष्णात नेमबाज होण्याचा बहुमान मिळवणारी ती पश्चिम महाराष्ट्रातील पहिली नेमबाज होती. तिने राज्य, विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत यापूर्वी पाच सुवर्ण, एक रौप्य, तर दोन कांस्यपदकांची कमाई केली होती. 22 व्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर नाव गाजवणार्या शरयूने तिच्या मेहनतीने सांगलीसह सातारा जिल्ह्याचे नाव देशभरात पोहोचवले होते. शरयूच्या रूपाने एक तेजस्वी तारा गमावल्याची भावना पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केली.