Sangli memories Nana Patekar | घरचा माणूस-कधी रंगमंचावर... कधी मदतीला... सांगलीतला 'नाना'

Nana Patekar Sangli memories connection| घरचा माणूस-कधी रंगमंचावर... कधी मदतीला... सांगलीतला 'नाना'
Sangli memories Nana Patekar
सांगली नाट्य, चित्रपट कलाकार-तंत्रज्ञ कल्याण ट्रस्टच्या उ‌द्घाटनप्रसंगी नाना पाटेकर यांचा सत्कार करताना विजय कडणे.Pudhari photo
Published on: 
Updated on: 
Summary

काही कलाकार पडद्यावर येतात आणि भूमिका संपली की निघून जातात... काही मात्र भूमिका संपल्यानंतरही मनातून जात नाहीत. नाना पाटेकर हे त्यापैकीच एक. त्यांच्या संवादाला टाळ्या मिळाल्या, अभिनयाला दाद मिळाली; पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांनी माणूस म्हणूनही अनेकांच्या मनात जागा निर्माण केली. सांगलीशी त्यांचे नातेही असेच होते, कधी रंगभूमीच्या निमित्ताने, कधी सामाजिक बांधिलकीतून. तर कधी एखाद्या आठवणीच्या निमित्ताने...

- संजय खंबाळे

नाना पाटेकर आमच्या कुटुंबाशी असलेले खास मित्र. त्यांच्यासोबतच्या असंख्य आठवणी, गप्पा, आपुलकी आणि माणुसकीचा सहवास आयुष्यभर मनात राहील.

आज नाना काळाच्या पडद्याआड गेल्याची बातमी सांगलीकरांपर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांच्या येण्या-जाण्याच्या अनेक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. सांगलीच्या रंगभूमीवर नानांनी टाकलेली पाऊलखुण केवळ एखाद्या प्रयोगापुरती नव्हती. त्यांच्या सुरुवातीच्या नाट्यप्रवासात सांगली-मिरजसह कोल्हापूर, इचलकरंजी, बेळगाव आणि पुढे गोव्यापर्यंतचा पट जोडलेला होता.

'पुरुष 'मधला नाना आणि...

नानांच्या सांगलीतील रंगभूमीच्या आठवणी सांगताना १९८२ साल विशेष ठरते. पुरुष' या नाटकाच्या प्रयोगासाठी नाना सांगलीत आले होते. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झालेल्या त्या प्रयोगाने सांगलीच्या नाट्यरसिकांना नानांचा रंगभूमीवरील अभिनय जवळून अनुभवता आला. त्या काळात चित्रपटातील नाना आजच्याइतके सर्वदूर पोहोचलेले नव्हते. पुढे याच कलाकाराने हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. दंगलीनंतर सांगलीत....

२००९ मध्ये मिरज-सांगलीत दंगल झाली. शहराच्या सामाजिक सलोख्याला धक्का बसल्यानंतर २०१० मध्ये नाना सांगलीत आले. कलाकार म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून. 'सब का रब एक है' या विषयावर बोलताना त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला. कुराण आणि गीतेतील संदर्भ देत त्यांनी माणुसकीची बाजू मांडली. 'गुण्यागोविंदाने राहणारे हे शहर आहे, बंधुभाव हीच ताकद आहे, ती जपा,' असा संदेश त्यांनी सांगलीकरांना दिला. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधतानाही नानांचा नेहमीचा मोकळा अंदाज पाहायला मिळाला. 'कैसे बताऊँ मैं तुम्हें... मेरे लिये तुम कौन हो... ही कविता सादर करून वातावरणच हलकेफुलके करून टाकले.

पोलिस मुख्यालयातही हजेरी...

ज्येष्ठ नेते आर. आर. पाटील गृहमंत्री असताना सांगली पोलिस मुख्यालयात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन नाना पाटेकर यांच्याहस्ते झाले. पोलिसांच्या कार्यक्रमातही नानांची उपस्थिती वेगळीच रंगत आणणारी ठरली. मध्यंतरी इस्लामपूर येथे झालेल्या कार्यक्रमात नानांनी स्वतः त्यांच्या रंगभूमीवरील सुरुवातीच्या प्रवासाच्या आठवणी सांगितल्या होत्या. सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी, बेळगाव ते गोवा असा त्या काळातील नाट्यप्रवास त्यांच्या आठवणीत होता. म्हणूनच 'नाना आणि सांगली' ही गोष्ट केवळ एका कलाकाराच्या शहरमेटींची नाही.

एका संघर्ष करणाऱ्या रंगकर्मीपासून लोकप्रिय अभिनेता आणि सामाजिक भान जपणारा माणूस होण्यापर्यंतच्या प्रवासात सांगलीने त्यांना जवळून पाहिले आहे. नाना केवळ व्यासपीठावर येऊन औपचारिक उद्घाटन करून निघून जाणारे कलाकार नव्हते. समोरच्या माणसाशी थेट संवाद साधण्याची त्यांची हातोटी होती. त्यामुळे त्यांच्या भेटीची आठवण अनेकांच्या मनात राहिली.

आज नाना नाहीत. पण त्यांच्या भूमिका, पत्रकारांशी त्यांनी साधलेला मोकळा संवाद, महापुरानंतर मदतीसाठी पुढे केलेला हात आणि सांगलीकरांना दिलेला बंधुभावाचा संदेश... या सगळ्या आठवणी मात्र शहराच्या सांस्कृतिक स्मरणात राहतील, रंगभूमीवरचा नाना काळाच्या पडद्याआड गेला; पण सांगलीच्या आठवणींच्या रंगमंचावर त्यांचा प्रवेश अजूनही सुरू आहे.

महापुरावेळी मदत

२०१९ चा सांगली-कोल्हापूर महापूर सांगलीकरांच्या स्मरणातून कधीच पुसला जाणार नाही. पाणी ओसरल्यानंतरही हजारो कुटुंबांसमोर संसार उभा करण्याचे आव्हान होते. या काळात नाना पाटेकर सांगली-कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले. 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून पुरात अडकलेल्या आणि नुकसान झालेल्या अनेक कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. पडद्यावर अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारा नाना प्रत्यक्ष आयुष्यातही संकटात सापडलेल्या माणसाच्या पाठीशी उभा राहिला.

एका औषधासाठी नानांच्या सांगलीशी जोडलेल्या काही आठवणी तर आणखी वेगळ्या आहेत. साताऱ्यात एका चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना दिग्दर्शकाला त्रास झाला होता. उपचारासाठी लागणारे विशिष्ट औषध सांगलीत मिळते, अशी माहिती मिळाल्यानंतर ते औषध आणण्यासाठी नाना स्वतः सांगलीत आले होते, अशी आठवण जाणकार सांगतात. एखाद्या मोठ्या कलाकाराच्या आयुष्यात अशी घटना कदाचित छोटी असेल; पण शहराच्या आठवणींच्या वहीत अशाच छोट्या घटना मोठ्या होऊन राहतात.

जुने फोटो चाळताना १९८२-८३ ची एक आठवण. जागी झाली. दीनानाथ नाट्यगृहात 'पुरुष' नाटकासाठी नाना आले होते. त्याचवेळी आमच्या नाट्य, चित्रपट कलाकार-तंत्रज्ञ कल्याण ट्रस्टच्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेले. ते सांगलीत आले की घरी येत. त्यांना नॉनव्हेज खाण्याची आवड. त्यामुळे अनेक वेळा त्यांच्यासाठी डबा देण्याचेही भाग्य लाभले. वजरी हा प्रकार त्यांना खूप आवडायचा. १९८५ साली पन्हाळा येथे 'सूत्रधार' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्मिता पाटील आणि नाना पाटेकर यांच्यासोबत होतो. त्याचवेळी घरातून निरोप आला की, मला मुलगी झाली. हे समजताच नानांनी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी स्मिता पाटीलही तिथेच होत्या. नाना म्हणाले, 'स्मिता नाव ठेव.' त्यानुसार मी माझ्या मुलीचे नाव स्मिता ठेवले.

-विजय कडणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news