

सांगली : माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, ज्येष्ठ नेते मुन्ना कुरणे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मनगौडा रवी-पाटील, रणधीर नाईक यांच्यासह सांगली जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेश केलेले नेते, कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल, सांगली जिल्ह्यात पक्ष वाढवा, असे आवाहन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
मुंबईत वानखेडे स्टेडियम येथे हा राष्ट्रवादी प्रवेश सोहळा झाला. सांगली जिल्ह्यातून शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख, मुन्ना कुरणे, तम्मनगौडा रवी-पाटील, संग्राम जगताप, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक, पलूसचे नीलेश येसुगडे, आटपाडीचे अनिल पाटील, भाऊसाहेब गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षप्रवेश केलेले नेते, कार्यकर्ते यांचे स्वागत केले. सांगलीतून आमदार इद्रिस नायकवडी, निशिकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस दिग्विजय सूर्यवंशी, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, सांगली जिल्ह्यातील अनेक प्रश्नांची सोडवणूक केली जाईल. अडचणी दूर करण्यासाठी काम केले जाईल. नव्या-जुन्यांची मोट बांधून पुढे वाटचाल केली जाईल. राष्ट्रवादीत नेते, कार्यकर्त्यांना वार्यावर सोडले जात नाही. प्रत्येकाला संधी दिली जाते. तो विश्वास आम्ही मिळवला आहे. त्यामुळे नेते, कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी जवळचा वाटतो. बेरजेचे राजकारण करून विकास साधू. टेंभू, ताकारी, म्हैसाळ व अन्य योजना मार्गी लावल्या जातील. जिल्ह्यातील इतर प्रश्न सोडवले जातील. सहकारी साखर कारखाने, सूतगिरणी, इतर सहकारी संस्थांचे प्रश्न सोडवू. राष्ट्रवादी पक्षबांधणीवर लक्ष द्या. सभासद नोंदणी करा. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने राष्ट्रवादीची वाटचाल यापुढेही सुरू राहील. शिवाजीराव नाईक म्हणाले, सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही धाडसी नेत्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे पक्षवाढीचे काम ताकदीने करू. जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद दिसून येईल.
अजित पवार म्हणाले, सांगली जिल्ह्याला महायुतीच्या सरकारमध्ये प्रतिनिधीत्व मिळाले नाही. मात्र याआधीच्या काळात सांगली जिल्ह्याला प्रत्येक सरकारमध्ये तीन ते चार मंत्रिपदे मिळालेली आहेत, महत्त्वाची खाती मिळालेली आहेत. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील हे नेते सर्वसामान्य माणसांच्या मनात रुजले आहेत. सांगलीचे वातावरण आज वेगळे आहे. ते पूर्वपदावर आणायचे आहे. शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख हे ताकदवान नेते आहेत. जिल्ह्यातील प्रश्नांची त्यांना जाण आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा छोटेखानी कार्यक्रम घेतला आहे, सांगलीमध्येही लवकरच मोठा कार्यक्रम घेऊ.