Sangli Nursery fire: नर्सरीमधील आगीत होरपळलेल्या महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले

पसार झालेल्या पतीच्या मागावर पोलिसांची पाच पथके रवाना; महिलेच्या आकस्मिक मृत्यूची नोंद
Sangli Nursery fire
Sangli Nursery fire: नर्सरीमधील आगीत होरपळलेल्या महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढलेPudhari
Published on
Updated on

सांगली : सांगली शहरातील धामणीकडे जाणाऱ्या शांतिबन चौकात असणाऱ्या मयूर नर्सरीमध्ये आगीत होरपळून मृत्यू झालेल्या महिलेच्या मृत्यूचे गूढ आणखीन वाढले आहे. या महिलेचा पती शिव मनगुळे - लोंढे हा पसार असून त्याच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषणची दोन आणि विश्रामबाग पोलिसांची तीन अशी पाच पथके रवाना करण्यात आली आहेत.

शांतिबन येथील मयूर नर्सरीला शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये या ठिकाणी कामास असणाऱ्या निकिता शिव मनगुळे - लोंढे या 25 वर्षीय विवाहितेचा होरपळून मृत्यू झाला होता. आगीची घटना समजताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. यावेळी नर्सरीमध्ये असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये निकिता मनगुळे - लोंढे हिचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मृतदेहाचे सांगलीच्या शासकीय रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनामध्ये निकिता मनगुळे - लोंढे हिच्या तोंडातून व नाकातून फेस आल्याचे दिसून आले. त्यामुळे ज्यावेळी आगीची घटना घडली, त्यावेळी निकिता ही त्यामध्ये जिवंतपणे होरपळली गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या ठिकाणी निकिता व तिचा पती शिव असे दोघेही राहण्यास होते. आगीची घटना घडली, त्यावेळी निकिता असलेल्या पत्र्याच्या शेडला बाहेरून कडी असल्याचे सांगण्यात आले. तसेच आगीची घटना घडल्यानंतर निकिता हिचा पती शिव याने घटनास्थळावरून पलायन केल्याचेही काही प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जात आहे. त्याच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषणची दोन आणि विश्रामबाग पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आलेली आहेत.

तसेच निकिता हिचा होरपळून मृत्यू नेमका कशाने झाला, हे समोर आलेले नाही. शॉर्टसर्किटमध्ये लागलेल्या आगीत तिचा मृत्यू झाला, की तिला आतमध्ये कोंडून बाहेरून नर्सरीला आग लावण्यात आली? या सर्वदृष्टीने सध्या विश्रामबाग पोलिसांचा तपास सुरू आहे.

खुनाचा संशय

निकिता ही आगीत होरपळत असताना तिच्या पतीने घटनास्थळावरून पलायन केले असे सांगितले जात आहे. आगीची घटना घडली, त्यावेळी शिव हा त्या ठिकाणी होता की नाही? याचाही तपास विश्रामबाग पोलिसांकडून केला जात आहे. तसेच निकिता असलेल्या पत्र्याच्या शेडच्या पाठीमागच्या बाजूला सुरुवातीला आग लागली. त्यानंतर पत्र्याच्या शेडला आग लागली होती. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कसा झाला? तिचा पतीनेच खून केला का? यादृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत.

निकिता जिवंत जळाली?

निकिता हिच्या तोंडातून व नाकातून फेस आला होता. मृतदेह जळाल्यानंतर नाकातून व तोंडातून फेस येत नाही. परंतु जिवंत व्यक्ती जळाली, तर तिच्या नाकातून व तोंडातून फेस येतो. निकिता हिच्याही नाकातून व तोंडातून फेस आला होता. त्यामुळे ती यामध्ये जिवंत जळाली की तिला जिवंत जाळली? याबाबतचे गूढ निर्माण झाले आहे. यावेळी निकिताच्या मृतदेहावर कोठेही मारहाणीचे वळ दिसून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news