

कसबे डिग्रज : मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांसाठी कसबे डिग्रज व परिसरातून मराठा समाजबांधवांसह अन्यही समाजबांधवांकडून जेवण पाठवण्यात आले. बाजरीच्या भाकरी, भाजी, लोणचे, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या एकत्र करून पाठवण्यात आल्याच, शिवाय मुस्लिम समाजाच्यावतीने पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. मराठा, जैन समाजाने आर्थिक मदत केली. श्रीकृष्ण मंडळ, मोरया गणेशोत्सव मंडळ यांसह विविध मंडळे व कार्यकर्त्यांनी योगदान दिले.
यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंदराव नलवडे, उपसरपंच विनोद जगदाळे, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. ए. तांबोळी, उपाध्यक्ष जहांगीर पठाण, डॉ. हैदर तांबोळी, माजी सरपंच स्वप्निल नलवडे, दिनकर शिंदे, महादेव तेली, अजित काशीद, संजय शिंदे, बंडू सायमोते याचबरोबर अनेक समाजबांधव, ग्रामस्थ उपस्थित होते.
मुस्लिम समाजाकडून मराठा बांधवांसाठी पाठवली शिदोरी मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत सांगलीतील मुस्लिम समाजाकडून मंगळवारी मराठा बांधवांसाठी 20 हजार भाकरी व पिठले पाठवण्यात आले.
त्याचबरोबर अन्न, पाणी आणि इतर वस्तूंचीही मदत पाठवण्यात आली आहे. युनूस महात, कय्यूम पटवेगार, युसूफ ऊर्फ लालू मेस्त्री, माजी नगरसेवक फिरोज पठाण, करीम मेस्त्री, युनूस महात, इरफान शिकलगार, आरिफ बावा, इम्रान शेख आदींनी पुढाकार घेतला आहे.
शामरावनगरमधील बिरादरी हॉलमध्ये सोमवारपासून भाकरी करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये मुस्लिम महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी 20 हजार भाकरी व पिठले, शेंगदाण्याची चटणी तयार करण्यात आली. यासाठी शहरातील अमातुल्ला पठाण, मुन्ना पट्टेकरी, रज्जाक नाईक, सरफराज शेख, आयुब पटवेगार, मुदस्सर मुजावर, अंजीर फकीर, रहीम हट्टीवाले आदींचे सहकार्य मिळाले.