

मिरज : मिरज रेल्वे स्थानकात वादावादीतून धक्काबुक्की झाल्याने फलाटावर पडून एकाचा मृत्यू झाला. सतीश मोहिते (वय 32, रा. कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवार, दि. 11 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघा संशयितांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
याबाबत माहिती अशी, मिरज रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर चौघे नशेखोर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एकत्र बसले होते. यावेळी त्यांच्यात वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तिघांनी सतीश मोहिते याला ढकलून दिले. यावेळी तो फलाटावर पडला. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मिरज रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तिघेही नशेखोर असल्याने त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू होती. याबाबत मिरज रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सतीश मोहिते आणि संशयितांचा रस्त्यावर पडलेल्या बाटल्या गोळ्या करण्याचा व्यवसाय आहे. सर्वजण दिवसभर भंगार व बाटल्या गोळा करून झाल्यानंतर नशा करून रेल्वे स्थानकात येऊन बसले होते. यातूनच त्यांच्यात वाद झाला. त्यातूनच ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.