

सांगली ः शहरातील आमराई रस्त्यावरील 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी सात लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैभव विजय साबळे (वय 31, रा. ग्रीन एकर्स, धामणी रोड, सांगली) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. बुधवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
तक्रारदार तानाजी रुईकर यांच्या कंपनीमार्फत महापालिकेकडे आमराई रस्त्यावरील चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता. बांधकाम परवाना मंजुरीसाठी उपायुक्त साबळे याने दहा लाखांच्या लाचेची मागणी केली. याबाबत 17 फेब्रुवारीरोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर 25 फेब्रुवारीरोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणीत साबळे याने तडजोडीअंती 7 लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सोमवार, दि. 9 रोजी साबळे याला महापालिका मुख्यालयातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर अटकेची कारवाई करीत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
मंगळवारी साबळे याला न्यायालयाने एक दिवसाची कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपताच बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक अनिल कटके यांनी सांगितले.